सासवड : जुन्या कोडीत रस्त्यावर झुडपांचा वेढा | पुढारी

सासवड : जुन्या कोडीत रस्त्यावर झुडपांचा वेढा

सासवड; पुढारी वृत्तसेवा: सासवड नगरपालिका हद्दीतील सासवड ते जुना कोडीत रस्त्यावर शेकडो खड्डे तसेच रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत व झुडपांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. सासवड (ता. पुरंदर) येथील जुन्या कोडीत रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

संततधार पावसामुळे हा रस्ता जलमय झाला आहे. रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वारंवार करूनही कारवाई होत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेतीमाल ने-आण करण्यासाठी अत्यंत अडचणी येत आहेत. हा रस्ता वळणाचा असल्याने वळणावर समोरून येणार्‍या वाहनांचा अंदाज न आल्यामुळे अपघात घडत आहेत.

रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी व मानवाधिकार तालुकाध्यक्ष स्वप्निल जगताप यांनी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार फंडातून खडीकरण केले. तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी डांबरीकरण केले. परंतु आता या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या कडेला झुडपांचा वेढा पडला आहे, असे शेतकरी अनिकेत जगताप यांनी सांगितले.

Back to top button