

राजेंद्र खोमणे
नानगाव : गावांना गुर्हाळांमुळे प्रदूषणाने विळखा घातला असतानाच या गुर्हाळाच्या आश्रयाने तालुक्यात गुन्हेगारी डोके वर काढताना दिसत आहे. दौंडमधील वाढत्या गुन्हेगारीला गुर्हाळ व्यवसाय जबाबदार असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. त्यामुळे मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, अशीही चर्चा तालुक्यातील गुर्हाळ भागात होत आहे.
भीमा नदीपट्ट्यातील गावागावात गुर्हाळ व्यवसाय करण्यासाठी परप्रांतीचे लोंढे येत आहेत. गुर्हाळांवर काम करण्यासाठीदेखील परराज्यातील कामगार मोठ्या प्रमाणावर या भागात दाखल झालेले आहेत. या कामगारांचे सतत येणे जाणे सुरू असते, त्यामुळे कोण कधी, कुठे, केव्हा व कसा येतो याची माहिती त्या गुर्हाळ मालकाला देखील माहिती नसते.
सध्या दौंडच्या भीमा नदीपट्ट्यातील गावागावात घरफोडी, वाहनांची चोरी, दुकानातील चोर्यांचे प्रमाण वाढत चाललेले दिसून येत आहे. बाजार गावांमध्ये तर अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी चोर्या सुरू आहेत. अशा चोर्या पूर्वी खूप कमी स्वरूपात होत होत्या, मात्र अलीकडे याचे प्रमाण वाढले असून या होणार्या चोर्या नक्की कोण करतंय, अशी शंका उपस्थित झाल्यावर बाहेर राज्यातून आलेल्या कामगारांकडेदेखील शंकेचे बोट दाखविण्यात येते.
गुर्हाळावर आलेल्या कामगारांची माहिती ना मालकाकडे असते ना पोलिसांकडे ? त्यामुळे येणार्या लोंढ्यांच्या मध्ये परराज्यातील कितीतरी गुन्हेगार प्रवृत्तीचे कामगार या अशा तांड्यात सामील होत असतील हे सांगणेदेखील कठीण आहे. येणार्या कामगारांची सर्व माहिती गावातील ग्रामपंचायत, पोलिस व पोलिस पाटील यांच्या दप्तरी असणे गरजेचे आहे, परंतु तसे दिसत नाही.
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कामगार जर या तांड्यांच्या मध्ये असतील तर ते नक्कीच या भागात छोटे मोठे गुन्हे व चोरीसारखे प्रकार घडवू शकतात, त्यामुळे अशा परप्रांतीय टोळीवर कडक नजर ठेवणे गरजेचे आहे. मात्र आज अशा टोळ्यांकडे पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. गावातून मोटारसायकल चालविताना देखील हे कामगार मोठ्या वेगाने गाडी चालविताना दिसून येतात, यामुळे अपघातदेखील होतात. त्यामुळे अशा कामगारांवर कडक कारवाई व्हावी, असेदेखील नागरिक बोलून दाखवत आहेत.
गावागावात परराज्यातील गुर्हाळ व्यवसायीकांना गावातील शेतकरी भाडेतत्त्वावर जागा देत आहेत. अशा ठिकाणी गुर्हाळ चालक व त्यावरील काम करणारे अनेक मजूर रहातात. या नागरिकांची कागदपत्रे घेऊन पोलिस व ग्रामपंचायत प्रशासनाला देण्याची जबाबदारी ही त्या जमीन मालकाची आहे, परंतु अशी काहीच माहिती हे मालक देत नाहीत.
कागदपत्रे नसताना सिमकार्ड
मजूर म्हणून कामाला आलेल्या परराज्यातील नागरिकांना मोबाईलसाठी सिमकार्डची गरज असते. काहींच्या जवळ कसलेही कागदपत्रे नसतात तरीदेखील अशांना कोणाच्या तरी नावावर सिमकार्ड दिले जाते. भविष्यात जर गुन्ह्यात असे नागरिक अडकले तर "कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे" असेच म्हणण्याची वेळ नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही.