मुसळधार पावसाने निरा खोर्‍यातील धरणे तुडुंब | पुढारी

मुसळधार पावसाने निरा खोर्‍यातील धरणे तुडुंब

निरा; पुढारी वृत्तसेवा: निरा खोर्‍यातील सर्वच धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने धरणे पूर्ण भरल्याने निरा नदीत गुरुवारी (दि. 16) 43 हजार क्युसेक वेगाने वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. गुरुवारी सकाळी 35 हजार क्युसेक वेगाने सोडलेला पाण्याचा विसर्ग दुपारी वाढवण्यात आला. विसर्ग वाढवण्यात आल्याने निरा नदीवरील काही पूल पाण्याखाली जाणार असल्याने जलसंपदा खात्याने व पूर नियंत्रण कक्षाने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

वीर धरणातून पावणेचार वाजता निरा नदीत 43 हजार 733 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. यापूर्वा तो विसर्ग 32 हजार 459 क्युसेक होता. भाटघर धरणातून 9 हजार 600 क्युसेक, निरा देवघर धरणातून 5 हजार 60 क्युसेक, गुंजवणी धरणातून 1780 क्युसेक व वीर धरणातून 43 हजार क्युसेक असा विसर्ग सोडण्यात आला. या पाण्यामुळे लोणंद-सासवड रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा असल्याने पुढील वर्ष चांगले जाणार असल्याने समाधानाचे वातावरण आहे.

होळ येथील पूल पाण्याखाली
गेल्या दोन महिन्यापासून निरा नदीला कमी-अधिक प्रमाणात सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. फलटण आणि बारामती तालुक्याला जोडणार्‍या होळ येथील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने हा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील वाहतूक बंद झाली आहे. पूल बंद झाल्यामुळे बारामती व फलटण तालुक्यातील जनतेला मुरुम, सांगवी आणि निरा नदीच्या पुलावरून ये-जा करावी लागली.

 

Back to top button