

पुणे; पुढारी वृत्तसेवा: देशभर मोठ्या जल्लोशात आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत; मात्र अर्ध जग असलेल्या महिला वर्गासाठी मात्र आपण सुरक्षा पुरवू शकत नाही; हेच बुधवारी दुपारी नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या एका महिलेला तिघांनी बाथरूमजवळ शिवीगाळ करून मारहाण करत लुटल्याच्या घटनेवरून दिसून येत आहे.
ही घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हडपसर गाडीतळ परिसरात असलेल्या सार्वजनिक बाथरूमजवळ घडली. याप्रकरणी राजा नावाचा व्यक्ती व दोन महिला अशा तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तुकाईदर्शन येथील एका 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिला व त्यांच्या बहिणीचा मुलगा असे दोघेजण तुकाईदर्शन येथे पीएमटी बसने निघाले होते. फिर्यादींना नैसर्गिक विधीला जायचे असल्याने त्या गाडीतळ बसथांब्याच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक बाथरूमध्ये गेल्या होत्या. तेथे दोन महिला व राजा नावाच्या व्यक्तीने फिर्यादींना शिवीगाळ करून हातांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच त्यांच्याजवळील अडीच हजार रुपयांची रोकड व मोबाईल बळजबरीने चोरी करून पळ काढला. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.