बाणेर : शहर विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे : चंद्रकांत पाटील | पुढारी

बाणेर : शहर विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे : चंद्रकांत पाटील

बाणेर; पुढारी वृत्तसेवा: ‘पुणे शहरात पायाभूत सुविधाही वाढवणे गरजेचे आहे. शहरात मूलभूत सुविधांबरोबरच नागरिकांच्या मानसिक गरजाही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आगामी काळात शहराच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे,’ असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पाषाण-सूसखिंड येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विलास कानडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आदी या वेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘नागरिकांच्या मागणीनुसार या पुलाला राजमाता जिजाऊ भोसले उड्डाणपूल, असे नाव देण्यात येईल. येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा उड्डाणपूल महत्त्वाचा ठरणार आहे. पाषाण- सूस भागातील घनकचरा प्रकल्प हलवण्याची नागरिकांची मागणी असून, येथील लोकप्रतिनिधींनी नागरीवस्तीपासून दूर असलेली योग्य जागा शोधावी.

या जागेचे संपादन करून तेथे हा प्रकल्प स्थलांतरित करण्यात येईल.’ मोहोळ म्हणाले,‘अनेक वर्षांची नागरिकांची मागणी या उड्डाणपुलामुळे पूर्ण झाली आहे. भाजप विकासकामे करताना पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करून ते करत आहे.’

कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडी!
उड्डाणपुलाजवळ रस्ता व पदपथावर मंडप टाकून उद्घाटन कार्यक्रम घेतल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. जवळपास अर्धा रस्ता कार्यक्रमांमध्ये अडवला गेला होता. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेतलेल्या पुलाच्या उद्घाटनामुळेच वाहतूक कोंडी झाली, अशी चर्चा मात्र ये-जा करणार्‍या नागरिकांकडून ऐकावयास मिळाली.

 

Back to top button