पुणे : मासिक पाळीविषयी विद्यार्थिनींत वाढली सजगता | पुढारी

पुणे : मासिक पाळीविषयी विद्यार्थिनींत वाढली सजगता

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आधी मासिक पाळी आली की, विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठीही भीती वाटायची. पण, आता चित्र बदलले असून, शालेय विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळीविषयी सजगता वाढली आहे. त्या मनमोकळेपणाने बोलत आहेत अन् त्या शिक्षिकांकडे अडचणीही मांडत आहेत. विद्यार्थिनीच नव्हे, तर आता त्यांच्या महिला पालकही जागृत झाल्या असून, हे घडले आहे ते शाळांकडून राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांमुळे…सध्या मासिक पाळीविषयी विद्यार्थिनींना जागरुक करण्यासाठी तज्ज्ञांच्या व्याख्यानांपासून ते मार्गदर्शन सत्रापर्यंतचे उपक्रम राबविले जात आहेत. खासकरून कन्या शाळांमध्ये दर एक महिन्यानंतर असे उपक्रम घेतले जात आहेत.

विद्यार्थिनी सॅनिटरी नॅपकीन वापरण्यापासून ते मासिक पाळीच्या दिवसांमध्ये घ्यावयाच्या काळजीपर्यंत याविषयी दक्ष बनल्या आहेत. सहावी ते दहावीतील विद्यार्थिनींसाठी शाळांमध्ये उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळीविषयी जागृतीसाठी विविध संस्थांकडून मार्गदर्शक सत्र घेण्यात येत आहेत. विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकीन वेडिंग मशिनही बसविले असून, त्यामुळे विद्यार्थिनीची अडचण दूर झाली आहे.

विद्यार्थिनी पाळीच्या अडचणींविषयी शिक्षिकांशी मोकळेपणाने बोलतात, असे आबासाहेब अत्रे दिन प्रशालेच्या मुख्याध्यापिका दीपमाला धायगुडे यांनी सांगितले. पीईएस मॉडर्न गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापिका माया नाईक म्हणाल्या, की मासिक पाळीविषयी जाणविणार्‍या विविध अडचणींविषयी आता विद्यार्थिनी मुक्तपणे बोलू लागल्या आहेत. विद्यार्थिनी मोकळ्यापणाने त्याबद्दल शिक्षकांकडे संवाद साधत आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मासिक पाळीविषयी विद्यार्थिनींना माहिती देण्यासाठी शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. दर दोन महिन्यांनी तज्ज्ञांचे सत्र, व्याख्याने, मासिक पाळीविषयी लघुपट दाखविणे, असे उपक्रम राबवीत आहेत.

वयात येणार्‍या या विद्यार्थिनींना मासिक पाळी म्हणजे काय, इथपासून ते सॅनिटरी नॅपकिन कसे वापरावे, त्याची योग्य विल्हेवाट कशी लावावी, याविषयी आम्ही उपक्रम राबवीत आहोत. त्यासाठी विद्यार्थिनींच्या आईंनाही यात सहभागी करून घेत त्यांच्यासाठी माता-पालक मेळावाही घेतो. काही वैद्यकीय तज्ज्ञांची व्याख्याने त्यांच्यासाठी घेतली जात आहेत. तसेच, सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिनही शाळेतील विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहात बसविले आहेत आणि सॅनिटरी नॅपकिनची योग्य विल्हेवाट लावण्यासाठीची व्यवस्थाही विद्यार्थिनींसाठी केली आहे.
                                            – अनघा डांगे, मुख्याध्यापिका,
                                           अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स

शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी संस्थेतील संवादक शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन सत्र घेतात. मासिक पाळी म्हणजे काय इथपासून ते त्या दिवसांमध्ये घ्यावयाच्या काळजीपर्यंत याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली जात आहे. समज-गैरसमज दूर होऊन याविषयी मुक्तपणे बोलले जावे, हा आमच्या प्रमुख उद्देश आहे.
                                               – सचिन आशा सुभाष, समाजबंध संस्था

Back to top button