डाळज नंबर १ येथे घरफोडी, चार लाखांचा मुद्देमाल लुटला | पुढारी

डाळज नंबर १ येथे घरफोडी, चार लाखांचा मुद्देमाल लुटला

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : डाळज नंबर १ येथे अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी (दि.१५) भरदिवसा शेतकऱ्यांच्या घराचे कडी कोयंडा उचकटून लोखंडी कपाटात ठेवलेले किंमती सोने व रोख रक्कम असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला आहे. गेल्या काही दिवसात गलांडवाडी येथेही अशीच मोठी चोरी झाली होती. त्यामुळे चोरट्यांनी आता खेड्यात धुमाकुळ घालण्यास सुरुवात केल्याने लहान गावात वातावरण भयभीत होऊ लागले आहे.

प्रकाश साहेबराव जगताप (वय ६८, रा. डाळज नंबर १, ता.इंदापूर) यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी काल गुरुवारी सकाळी सात ते दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान ही चोरी केली आहे. अज्ञात चोरट्यांनी जगताप यांच्या घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व लोखंडी कपाटात ठेवलेले रोख सात हजार तसेच तीन तोळ्याचा सोन्याचा राणीहार, सोन्याच्या चार बांगड्या, चार अंगठ्या असा एकुण ४ लाख ७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून पोबारा केला आहे. याबाबत जगताप यांनी भिगवण पोलिसात तक्रार दिली असुन तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील व त्यांचे पथक तपास करीत आहे.

Back to top button