मंचर : गणेश विसर्जनानंतर मांसाहारावर शौकिनांचा ताव | पुढारी

मंचर : गणेश विसर्जनानंतर मांसाहारावर शौकिनांचा ताव

मंचर; पुढारी वृत्तसेवा: गणेश विसर्जनानंतर दुसर्‍या दिवसापासूनच मांसाहार शौकिनांची चिकन आणि मटणाच्या दुकानावर गर्दी होत आहे. त्यामुळे चिकन आणि मटणाचे बाजारभाव कडाडले आहेत. लम्पी रोगाचा कोणताही संबंध कोंबडी, मेंढी किंवा बकर्‍याशी नसल्याचा निर्वाळा पशुसंवर्धन विभागाने दिल्याने बिनधास्तपणे मांसाहार खवय्ये ताव मारत आहेत.

गणेशोत्सवाच्या दुसर्‍या दिवसापासूनच ब्राॅयलर कोंबडीच्या घाऊक दरात मोठी वाढ झाली आहे. चिकनचे दर 160 ते 170 रुपये किलोवरून आठच दिवसांत 230 रुपयांवर गेल्याचे कळंब येथील चिकन विक्रेते इसाक शेख आणि घोडेगाव येथील घाऊक कोंबडी व्यापारी जावेद मिस्त्री यांनी सांगितले. ब्राॅयलर कोंबडीचे दर 125 रुपये किलोवर गेले आहेत.

घाऊक दरात दररोज दहा ते पंधरा रुपयांनी वाढ होत असल्याने कंपनी आणि पोल्ट्री चालकांना सुगीचे दिवस आल्याचे वैदवाडी येथील पोल्ट्री व्यावसायिक सागर तापकीर आणि अवसरी खुर्द येथील पोल्ट्री व्यावसायिक धनंजय ढूमणे आणि वसंत शिंदे यांनी सांगितले. सध्या घाऊक बाजारात मालाची मोठ्या प्रमाणावर कमतरता असून मांसाहार शौकिनांची मागणी वाढल्याने चिकनच्या मालाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे बाजारभावात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाल्याचे ब्राॅयलर व्यवस्थापन करणार्‍या कंपनीकडून सांगण्यात आले.

ब्राॅयलर कोंबडीचे घाऊक दर वाढल्याने ब्राॅयलर फार्मिंग करणार्‍या शेतकर्‍यांना आणि कंपनींना सुगीचे दिवस आले आहेत. सध्या व्हाट्सअपच्या माध्यमातून लम्पी आजाराविषयी काही समाजकंटक पोस्ट व्हायरल करत असल्याने ब्राॅयलर कोंबडी आणि मटण विक्रीवर परिणामाची शक्यता घाऊक बाजारात वर्तवण्यात येत आहे.

ब्राॅयलर कोंबडीमध्ये अद्याप लम्पी आजाराची लक्षणे आढळलेली नाहीत. काही खोडसाळ व्यक्ती जाणून बुजून अशी चित्रे व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करून लोकांना संभ्रमित करीत आहेत. लम्पी आजार फक्त गाई आणि बैलामध्ये आढळलेला आहे. अद्याप म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि ब्राॅयलर कोंबड्यांमध्ये हा आजार आढळलेला नाही, असे कळंब पशुवैद्यकीय अधिकारी वृषाली म्हस्के यांनी सांगितले.

चुकीची पोस्ट करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा
लम्पी रोगासंदर्भात जे काही फोटो व्हाट्सअपच्या माध्यमातून काही समाजकंटक व्हायरल करत आहेत, ती माहिती संपूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे चिकन, मटण खाण्यास काहीही हरकत नाही. उगाचच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना जे संभ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आंबेगाव अ‍ॅग्रोचे शफी मोमीन आणि ऊर्जा कंपनीचे मालक प्रमोद हिंगे पाटील यांनी केली.

Back to top button