खोर : अंजीराच्या ‘खट्टा’ बहाराला सुरुवात | पुढारी

खोर : अंजीराच्या ‘खट्टा’ बहाराला सुरुवात

खोर; पुढारी वृत्तसेवा: दौंड तालुक्यातील अंजीराचे गाव म्हणून खोर या गावाकडे पाहिले जाते. खोरच्या परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असून देखील अंजीराच्या बागा बहरल्या आहेत. सध्या अंजीराच्या ‘खट्टा’ बहाराला सुरुवात झाली आहे. येत्या 10 दिवसारत हा बहार सुरू होणार असून हा हंगाम जानेवारीपर्यंत चालू असतो. त्यानंतर जानेवारीपासून ते एप्रिलपर्यंत शेतकरी अंजीराचा ‘मिठा’ बहाराचा हंगाम घेतात.

वर्षभरात जवळपास 8 ते 9 महिने या भागामध्ये अंजीर उपलब्ध असते. अंजीररत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी समीर डोंबे म्हणाले की, अंजीराच्या ‘पवित्रक’ जातीला संपूर्ण देशात मोठी मागणी आहे. दिल्ली, हैद्राबाद, बेंगलोर, अहमदाबाद, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, मालेगाव, परभणी, नाशिक, अहमदनगर अशा विविध ठिकाणी खोरच्या अंजीराला मोठी मागणी आहे.

खोरचे अंजीर हे प्रदूषणविरहित व मुक्त वातावरणात तयार झाले असून एवढा मोठा या भागात पाऊस असून देखील कुठल्याही प्रकारची रोगराई या झाडांना झालेली नाही. इतर तालुक्यात अंजीराच्या झाडांना तांबेरा झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी खट्टा बहाराच्या माध्यमातून मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.

खोरचे अंजीर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. बागांना चांगला बहार आल्याने यंदा खट्टा बहारात मोठी उलाढाल होण्याची चिन्हे आहेत.
समीर डोंबे, अंजीर उत्पादक शेतकरी.

Back to top button