पुणे-सातारा रस्त्यावर अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही | पुढारी

पुणे-सातारा रस्त्यावर अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा: पुणे – सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर बाग परिसरात पेट्रोल पंपासमोर १६ सप्टेंबरला सकाळी साडे सहाच्या दरम्यान एका ट्रक ने अँसिडचे कॅन घेऊन निघालेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शिवगंगा खोऱ्यात गुरुवारी संध्याकाळपासून पावसाने जोर धरल्यामुळे पुणे- सातारा रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यातच शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पुण्याहून साताऱ्याकडे अँसिडने भरलेला ट्रक कॅन घेऊन निघाला होता.

या ट्रकला पाठीमागून औषधे भरून निघालेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकची एक बाजू पूर्णपणे सपाट झाली होती. वाहन चालक व सहाय्यक ट्रक मध्ये होते, मात्र सहाय्यक हा चालकाच्या पाठीमागे असलेल्या सीटवर झोपला होता, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

दरम्यान राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल कोल्हे, अमोल सूर्यवंशी हे घटनास्थळी दाखल झाले. धडक बसलेल्या ट्रक मध्ये अँसिडचे कॅन असल्याने पुढील अनर्थ टाळण्यासाठी पेट्रोलिंगचे अभिजित गायकवाड व अन्य कर्मचाऱ्यांनी खासगी पाण्याच्या टँकरला पाचारण करून पुणे शहरातून फायर ब्रिगेडला कळविण्यात आले. तत्पूर्वी पाण्याच्या टँकरमधील पाण्याने ट्रकवर फवारणी केली.

पुणे सातारा महामार्गावर कायमच अशा प्रकारच्या घटना घडत असतात. त्यावेळी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल असतात, मात्र महामार्ग पोलीस व कर्मचारी घटनास्थळी पोहोचत नसल्याने कायमच ‘वराती मागून घोडे’ अशी चर्चा नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे.

Back to top button