

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चाकण येथील एका कंपनीतील महिला कर्मचार्यांशी गैरवर्तन करणार्या राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल तसेच, शिवक्रांती कामगार संघटनेचा तालुका अध्यक्ष चेतन कारंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी संबंधित महिला कर्मचार्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार आयुक्त व पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर म्हाळुंगे चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत पीडित महिलांनी गुरुवारी (दि. 15) पत्रकार परिषद घेऊन आरोपी अटक केल्याची माहिती दिली.
संबंधित कंपनीत सुमारे दीड हजार कर्मचारी असून त्यात 350 महिला कर्मचारी आहेत. कंपनीत शिवक्रांती ही मान्यताप्राप्त कामगार संघटना आहे. या संघटनेचा अध्यक्ष आरोपी कारंडे आहे. दरम्यान, कारंडे याने कंपनीच्या दोन महिला कर्मचार्यांशी अश्लील वर्तन केले. तसेच, त्यांची छेडही काढली. याबाबत महिलांनी कंपनी व्यवस्थापनासह पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारंडे याला अटक केली. न्यायालयाने त्याची रवानगी कोठडीत केली आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून काही महिलांनी नोकरीदेखील सोडल्याचे पीडित महिला कर्मचार्यांनी सांगितले. कारंडे याला अटक केल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्याशी संपर्क केला त्यांनी दुजोरा दिला आहे.