धक्कादायक ! व्याजाच्या पैशासाठी महिलेला पळवून नेण्याचा प्रयत्न, सावकार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल | पुढारी

धक्कादायक ! व्याजाच्या पैशासाठी महिलेला पळवून नेण्याचा प्रयत्न, सावकार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ऐंशी हजार रुपयांच्या बदल्यात दोन लाख 84 हजार रुपये देऊनही सावकार महिलेने एका महिलेला त्रास दिला. तसेच, तिला दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मे 2021 ते सप्टेंबर 2022 दरम्यान प्रियदर्शनीनगर, लेन नंबर 4, जुनी सांगवी आणि एसटी कॉलनी, जुनी सांगवी येथे घडला. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि. 14) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सावकार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेने आरोपी महिलेकडून 80 हजार रुपये दरमहा 20 ते 30 टक्के व्याजदराने घेतले होते. त्यानुसार, फिर्यादी यांनी प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला आरोपी महिलेला 16 हजार रुपये दिले. दरम्यान, फिर्यादी यांच्या पतीने 1 मे 2022 रोजी त्यांच्या बँक खात्यावरून 80 हजार रुपये आरोपी महिलेला ट्रान्सफर केले होते. तसेच 12 हजार रुपये कॅश स्वरूपात दिले. अशाप्रकारे फिर्यादी यांनी आरोपी महिलेला आतापर्यंत दोन लाख 84 हजार रुपये दिले. मात्र, तरीदेखील आरोपी महिला फिर्यादी यांच्याकडे आणखी 30 हजार रुपयांची मागणी करीत होती. त्यासाठी तिने फिर्यादी यांच्या नवर्‍याचे हातपाय तोडण्याची धमकी दिली.

दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांच्याकडून कोरा चेक आणि शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीने सह्या घेतल्या. त्यानंतर तीन अनोळखी इसमांना घेऊन फिर्यादी यांच्या घरी येऊन धिंगाणा घालत फिर्यादी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच, फिर्यादी यांना दुचाकीवर जबरदस्तीने बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादी यांनी दुचाकीवरून उडी मारून स्वतःची सुटका करून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कदम करीत आहे.

Back to top button