पिंपरी : आयुक्त म्हणतात, ‘पालिका रुग्णालयांचे वाढीव दर योग्यच !’ | पुढारी

पिंपरी : आयुक्त म्हणतात, 'पालिका रुग्णालयांचे वाढीव दर योग्यच !'

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व रुग्णालये व दवाखान्यांच्या रुग्ण उपचार सेवा शुल्कात 1 ऑगस्ट 2022 पासून वाढ करण्यात आली आहे. इतर महापालिका व शासकीय रुग्णालये आणि ससून सर्वोपचार रुग्णालयांच्या दरांच्या तुलनेत पालिका रुग्णालयांचे दर कमीच आहेत, असा दावा करीत महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दरवाढीचे समर्थन केले आहे. पालिकेने यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयांसह भोसरी, आकुर्डी, थेरगाव, जिजामाता या रुग्णालयांत तसेच, दवाखान्यांत अनेक सोईसुविधा वाढविल्या आहेत. खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन वैद्यकीय विभागाने रुग्णांच्या उपचार सेवा शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या समोर ठेवला होता.

त्यास त्यांनी तत्काळ मंजुरी दिली. ती दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी केली आहे. मात्र, पाटील यांनी ती दरवाढ मागे घेतली नाही. पालिका रुग्णालय व दवाखाना शुल्कात 1 ऑगस्टपासून दुप्पट ते तिप्पट वाढ करण्यात आली. त्याबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यासंदर्भात विचारले असता ते बोलत होते. आयुक्त म्हणाले की, पालिकेने केलेली रुग्णालय व दवाखान्यांची दरवाढ ही योग्यच आहे. पुणे पालिका व ससून सर्वोपचार व इतर शासकीय रुग्णालयांच्या दराची तुलना केल्यास पालिकेचे दर कमीच आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आयुक्त दरवाढ मागे घेणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

उत्पन्नात 45 लाख 38 हजार 404 रुपयांची वाढ
जुलै 2022 मध्ये मिळालेले पालिका रुग्णालय व दवाखान्यांतून मिळालेले उत्पन्न : 79 लाख 2 हजार 217
ऑगस्ट 2022 महिन्यात मिळालेले पालिका रुग्णालय व दवाखान्यांतून मिळालेले उत्पन्न : 1 कोटी 24 लाख 40 हजार 621
दरवाढ केल्याने उत्पन्नात 45 लाख 38 हजार 404 रुपयांची वाढ झाली आहे

Back to top button