पुणे : लम्पी प्रसारात पुढील 15 दिवस महत्त्वाचे | पुढारी

पुणे : लम्पी प्रसारात पुढील 15 दिवस महत्त्वाचे

पुणे; पुढारी वृत्तसेवा: लम्पी स्किन रोगाच्या प्रसारासाठी पुढील 15 दिवस महत्त्वाचे आहेत. जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव दिसताच शेतकर्‍यांनी पशुधन अधिकार्‍यांना कळवावे. केवळ शासकीय दवाखान्यातच लस घ्यावी. लसीचा आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली.

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यंत 76 गावांमध्ये जवळपास 306 जनावरे बाधित झाली आहेत. वेल्हे तालुक्यात अद्याप लम्पीचा शिरकाव झाला नसला तरी काही संशयित जनावरांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. बाधित 306 जनावरांमध्ये 202 गाई व 104 बैलांचा समावेश आहे.

सध्या 177 पशुधन या आजाराने सक्रिय असून 121 जनावरे बरी झाली आहेत, तर 8 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या लसीकरणासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत 97 हजार 632 गाई, 15 हजार 409 बैल, 15 हजार 339 म्हशी अशा एकूण 1 लाख 28 हजार 380 जनावरांना लस देण्यात आल्याचे डॉ. विधाटे यांनी सांगितले.

लम्पीचा प्रादुर्भाव झालेल्या 76 गावांच्या पाच किलोमीटर परिघात 533 गावांचा समावेश आहे. या गावांमधील जनावरांना लस देण्याचे काम सुरू आहे. राज्यासाठी सुमारे 50 लाख लसींची खरेदी करण्यात आली असून पुढील आठवड्यात मंगळवारपर्यंत राज्यात ही लस पोचेल असे त्यांनी सांगितले.

बाधित गावांच्या परिसरातील सुमारे 30 टक्के जनावरांचे लसीकरण झाले आहे. शेतकर्‍यांनी खासगी डॉक्टरांकडून उपचार करू नयेत. प्रोटोकॉलनुसारच उपचार करावेत. गोठ्यातील डासांचे नियंत्रण केल्यास हा विषाणू पसरत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लम्पीमुळे रिक्त जागांवर डॉक्टर…?
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन दवाखान्यातील डॉक्टरांच्या 36 जागा सध्या रिक्त आहेत. या जागांसह जिल्ह्यातील इतर जागांसाठी भरती केली जाण्याची शक्यता आहे. कंत्राटी स्वरूपात ही पदे भरली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लम्पीमुळे गावांमधील दवाखान्यांमध्ये आता डॉक्टर मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष ग्रामस्तरावर काम करताहेत. माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. सुमारे 533 गावांमध्ये लसीकरणाचे काम सुरू आहे. सध्या औषधांचा तुटवडा जाणवत असला तरी जिल्हा परिषदेने 6 लाखांची औषधे खरेदी केली आहेत. औषधांचा साठा उपलब्ध होत आहे. सर्व बाधित जनावरांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत.

                                                                            – डॉ. शिवाजी विधाटे,
                                                          जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद

Back to top button