खडकवासला : कष्टकरी महिलेमुळे वाचले आत्महत्या करणार्‍या तिघांचे जीव | पुढारी

खडकवासला : कष्टकरी महिलेमुळे वाचले आत्महत्या करणार्‍या तिघांचे जीव

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: खडकवासला धरणात दोन लहान लेकरांसह उडी मारून आत्महत्या करणार्‍या महिलेला रोखून एका खाद्य पदार्थ विक्रेत्या महिलेने तिघांचे जीव वाचवले.  विक्रेत्या महिलेच्या प्रसंगावधानतेने कात्रज परिसरात राहणार्‍या तीस वर्षीय महिलेचे व तिच्या दोन लहान लेकरांचे प्राण वाचले.

एकीकडे मानवतेचे नाते जपणारी कष्टकरी खाद्य पदार्थ विक्री करणारी महिला आणि दुसरीकडे दोन लहान लेकरांसह धरणात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला, असे परस्परविरोधी महिलांचे रूप गुरुवारी दुपारी खडकवासला धरणाच्या चौपाटीवर पाहावयास मिळाले. रंजना जाधव, असे खाद्य पदार्थ विक्रेता महिलेचे नाव आहे.

जाधव यांचा पुणे-पानशेत रस्त्यावरील खडकवासला धरणाच्या चौपाटीवर कांदा भजी विक्रीचा स्टाल आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एक महिला धरणाच्या पाण्यात दोन लहान मुलांसह उडी मारत असल्याचे जाधव यांना दिसले. त्या वेळी हातातील काम तसेच टाकून शेजारच्या रंजना हिने काजल बडदे हिच्यासह धरणावर धाव घेतली.

त्या वेळी कडेवरील एक वर्षाच्या मुलीचे दोन्ही हात दोरीने बांधून व दुसर्‍या मुलीला हातात धरून महिला खोल पाण्याकडे चालली होती.रंजना व काजल यांनी महिलेच्या हाताला धरून मुलांसह धरणाच्या कडेला आणले. आरडाओरड ऐकून धरणाच्या कडेवर असलेले वाहतूक पोलिस हवालदार विलास भांबळे यांनी पोलिस मित्र बाळकृष्ण डावखर यांच्यासह धरणावर धाव घेतली. हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार अजय पाटकर यांनी महिलेला मुलांसह पोलिस ठाण्यात आणले. तेथे महिलेला समज देऊन तिच्या पतीच्या ताब्यात दिले.

खाद्यपदार्थ विक्रेता महिलेच्या प्रसंगावधानतेने आत्महत्येची दुर्दैवी घटना टळली. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने महिला दोन लहान लेकरांसह धरणात उतरली होती. ही महिला मानसिक आजारी आहे. यापूर्वी तिने घरात मोठे नुकसान केले होते. आजारपण व प्रापंचिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.अजय पाटकर, पोलिस हवालदार

 

Back to top button