पुणे : अकरा लाखांचा गुटखा पकडला; दोघांना अटक | पुढारी

पुणे : अकरा लाखांचा गुटखा पकडला; दोघांना अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गुटख्याचा साठा करून त्याची छुप्या पद्धतीने विक्री करणार्‍या दोघांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली. दोघांनी शेवाळवाडी भागात पत्र्याच्या शेडमध्ये साठा करून ठेवलेला 11 लाख 28 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, त्यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मदनलाल प्रजापती (56), व्रजापती (26, रा. बोरकर वस्ती, लोणी काळभोर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर पंकज, मॉण्टी या त्यांच्या साथीदारांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणे, विक्री करण्यास बंदी आहे. मात्र, तरीही अनेक भागात छुप्या पध्दतीने विक्री सुरू असून अशा ठिकाणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येते.
दरम्यान, हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेवाळवाडी परिसरात काही जणांनी गुटख्याची साठवणूक केली असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. संबंधित ठिकाणाहून पोलिसांच्या पथकाने 11 लाख 28 हजारांचा साठा जप्त केला आहे. युनिट 5 चे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे करीत आहेत.

हडपसर गुटखा वितरणाचे केंद्र ?
सध्या शहरातील टपर्‍या-टपर्‍यांवर गुटखा सर्रास मिळताना दिसत आहे. त्यातच बुधवारी गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने 11 लाखांचा गुटखा पकडल्याने त्याच्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. यापूर्वी जूनच्या शेवटच्या आठवड्यात 52 लाख 18 हजारांच्या गुटख्यासह ट्रक पकडण्यात आला होता. हा गुटखा हैदराबाद येथून पुण्यात आल्यानंतर पकडण्यात आला होता.

या कारवाईला चार दिवसांचा कालावधी लोटतो ना लोटतो तोच हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतच 25 लाखांचा गुटखा पकडण्यात आला होता. त्याबरोबर हडपसरला लागून असलेल्या मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनही याच दरम्यान गुटखा पकडण्यात आला होता. त्यामुळे हडपसर गुटखा वितरणाचे केंद्र तर नाही ना ? हडपसर येथेच वारंवार गुटखा कसा सापडतो ? स्थानिक पोलिस असताना गुन्हे शाखेला कारवाई करण्याची वेळ का येते , असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

Back to top button