काँग्रेसला गुगलवर शोधण्याची वेळ लवकरच येणार; केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल | पुढारी

काँग्रेसला गुगलवर शोधण्याची वेळ लवकरच येणार; केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल

मंचर, पुढारी वृत्तसेवा: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्यापेक्षा काँग्रेस पार्टीमध्ये माणसं जोडण्याचे काम केले पाहिजे. कारण कितीतरी नेते काँग्रेस सोडून चालले आहेत. पुढील काळात काँग्रेसला गुगलवर शोधण्याची वेळ येऊ शकते. सध्या काँग्रेस ही नेतृत्वहीन झाली असून, गेल्या आठ वर्षांपासून मोदी सरकारने जनसामान्यांसाठी काम करताना चांगले निर्णय घेतले असल्याचे स्पष्ट मत केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी व्यक्त केले.

मंचर (ता. आंबेगाव) येथे पत्रकार संवाद मेळावा कार्यक्रमाप्रसंगी रेणुका सिंह बोलत होत्या. या वेळी आमदार महेश लांडगे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, धर्मेंद्र खांडरे, संजय घुडरे, आशाताई बुचके, अतुल देशमुख, जयसिंगराव एरंडे, ताराचंद कराळे आदींसह भाजपचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

रेणुका सिंह म्हणाल्या, बाल लैंगिक अत्याचार, आदिवासी रोजगार निर्मिती, हिरडा खरेदी, कांदा निर्यात बंदी, बटाटा खरेदी, लम्पी आजारामुळे बैलगाडा शर्यतीची सध्याची बंदी, रेल्वे महामार्ग, विमानतळ, मोबाईल टॉवर तसेच आदिवासी जमिनीबाबत लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून विविध प्रश्नांसंदर्भात कार्यवाही केली जाईल. प्रास्ताविक संजय थोरात यांनी केले, सूत्रसंचालन व आभार पूजा थिगळे यांनी मानले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात कमळ उमलणारच

शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रलंबित विकासकामे मार्गी लावून विकासाच्या जोरावर कमळाचे फूल उमलणारच, असा विश्वास रेणुका सिंह यांनी व्यक्त केला. शिरूर मतदारसंघात भाजप आपली ताकद अजमावणार आहे. या मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे दिली असून, या मतदारसंघाचा तीन दिवसीय दौरा मी करत असून या मतदारसंघातील अडीअडचणी समजून घेत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये २०२४ ला भाजपकडून उमेदवार उभा केला जाणार असल्याचे सूतोवाच रेणुका सिंह यांनी या वेळी दिले.

Back to top button