डिंभे उजव्या कालव्याच्या अस्थरीकरणाला मंचर परिसरातील ग्रामस्थांचा विरोध | पुढारी

डिंभे उजव्या कालव्याच्या अस्थरीकरणाला मंचर परिसरातील ग्रामस्थांचा विरोध

मंचर; पुढारी वृत्तसेवा: डिंभे धरण उजव्या कालव्याच्या सिमेंट अस्तरीकरणाला मंचर परिसरातील ग्रामस्थांचा विरोध असून, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या कामाला स्थगिती द्यावी, अशी मागणी मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांत बागल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केली आहे.

मंचर शहराच्या पश्चिमेकडून डिंभा प्रकल्पाचा उजवा कालवा जातो. त्यामुळे कालव्याच्या पाझर प्रक्रियेतून शहराच्या पूर्व पश्चिम भागातील विहिरी, तळी व कूपनलिका सतत भरलेली राहतात. परिणामी मंचरची पाण्याची जी मोठी समस्या आहे, ती प्रखरपणे कालव्याच्या पाणी पाझरामुळे जाणवत नाही. अस्तरीकरण झाल्यास तपनेश्वर ते मोरडे फूड कंपनी परिसरातील पूर्व भागातील विहिरी, तळी, कूपनलिका यांचा पाणी पुरवठा आपोआपच कमी होईल.

सद्यस्थितीत परिसरात अनेक निवासी गृहप्रकल्पांची निर्मिती झाली आहे. साधारणत: 10 ते 12 हजार नागरिक त्या भागात राहतात आणि त्याठिकाणी राहणार्‍या रहिवाशांची पाण्याची गरज विहीर आणि कूपनलिकामार्फतच भागवली जाते. सिमेंट अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले तर मंचर शहराच्या विविध भागात पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला भविष्यात सतत तोंड द्यावे लागेल.

पाणी परिस्थितीच्या वस्तुस्थितीचा विचार करून अस्तरीकरण स्थगित करण्याची मागणी मंचर, मोरडेवाडी, बागलवाडी, घुले- बागलमळा, माळवाडी, भिलवाडी येथील ग्रामस्थांनी केल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव मोरडे, विशाल मोरडे, मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुहास बाणखेले यांनी सांगितले.

 

Back to top button