...तब्बल 25 वर्षांनी भरला शिरदाळे ग्रामतलाव; नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली | पुढारी

...तब्बल 25 वर्षांनी भरला शिरदाळे ग्रामतलाव; नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली

लोणी धामणी; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याचे शेवटचे टोक आणि डोंगरावर वसलेले शिरदाळे हे गाव पावसाळ्यात एक निसर्गसौंदर्य म्हणून सर्वांना परिचित आहे. गावात असलेली धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू वा निसर्गसौंदर्य मग त्यात साग दरा, गावाला लाभलेले गाव तळे, गावातील बुरुंज आशा अनेक गोष्टी गावच्या सौंदर्यात भर टाकत असतात. या वर्षी पडलेला भरपूर पाऊस आणि निसर्गाची साथ यामुळे गावची जीवनवाहिनी असलेला गाव तलाव (तळे) तब्बल 25 वर्षांनी भरला आहे.

या अगोदर हा तलाव भरला होता. परंतु, त्या वेळी त्याचं खोलीकरण झालं नव्हतं. दरम्यान, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेवरून देवदत्त निकम आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून या गाव तलावाचे खोलीकरण 2007-08 च्या दरम्यान झाले आणि तब्बल 30 टक्के पाणीसाठा यामध्ये वाढला. त्यानंतर प्रथमच हा तलाव 100 टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटलाच आहे; शिवाय उन्हाळ्यात लागणारे पाणी, जनावरांची पाण्याची सोय झाली आहे.

तलावात सोडले मत्स्य बीज
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या तलावात मासे सोडण्यात आले असून, याचेदेखील उत्पन्न भविष्यात चांगले मिळणार आहे. तर, अजून वेगवेगळ्या प्रकारचे मत्स्य बीज यात सोडण्यात येणार असून, त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. मोकळ्या जागेत वृक्षारोपण, बगीचा अशा अनेक सोईसुविधा भविष्यात करण्यात येणार असल्याचे सरपंच वंदना गणेश तांबे, उपसरपंच मयूर संभाजी सरडे, माजी सरपंच व सुप्रिया मनोज तांबे, ग्रामपंचायत सदस्य बिपीन पंढरीनाथ चौधरी, जयश्री संतोष तांबे यांनी सांगितले.

हा तलाव म्हणजे आमच्यासाठी नैसर्गिक देणगी आहे. याचा फायदा आम्ही भविष्यात गावाला चांगल्या प्रमाणात करून देणार आहोत. महिलांसाठी स्वतंत्र धुणे धुण्यासाठी टँक, तसेच जनावरे धुण्यासाठी वेगळी जागा उपलब्ध करणार असून, यामुळे हे पाणी दूषित होणार नाही. ग्रामस्थांनीदेखील सहकार्य करून तलावात जनावरे धुणे किंवा घाण सांडपाणी टाकले नाही तर मस्त्य व्यवसायातून गावाला चांगले उत्पन्न मिळू शकते.

                                                        – मयूर सरडे, उपसरपंच, शिरदाळे

Back to top button