पुणे : आठ हजार जनावरांचे कात्रज दूध संघाकडून लसीकरण | पुढारी

पुणे : आठ हजार जनावरांचे कात्रज दूध संघाकडून लसीकरण

पुणे; पुढारी वृत्तसेवा: लम्पी त्वचारोग प्रतिबंधक लसीकरणासाठी आता पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानेही (कात्रज दूध संघ) पुढाकार घेतला असून, मोहीम स्वरूपात लसीकरण सुरू केले आहे.  संघाने आत्तापर्यंत आठ तालुक्यांतील 7 हजार 890 जनावरांचे लसीकरण पूर्ण केल्याची माहिती संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार यांनी दिली.

देशामध्ये लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव सुरू झालेला असून, राज्यात आणि पुणे जिल्ह्यातील जनावरे बाधित होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्व दूध उत्पादक शेतकर्‍यांनी जनावरांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसारच संघाने जिल्ह्यातील जनावरांना लम्पी त्वचारोग प्रतिबंधक लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे.

कात्रज दूध संघाच्या स्वतःच्या 17 पशुधन पर्यवेक्षकांमार्फत (एलएसएस) हे लसीकरण युध्दपातळीवर सुरू आहे. संघाने तत्काळ जनावरांच्या लसीकरणाची गावनिहाय मोहीम सुरू केली आहे. आठ तालुक्यांत लसीकरण मोहिमेने वेग घेतला असून खेड, पुरंदर आणि मावळ तालुक्यातही लसीकरणाची मोहीम वेगाने राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तालुकानिहाय झालेले लसीकरण
जुन्नर तालुका -2305, आंबेगाव -1490, शिरूर -1450, दौंड -1100, हवेली -450, वेल्हा -220, मुळशी -225, भोर -650 मिळून 7 हजार 890 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

Back to top button