सेवानिवृत्त एसीपीच्या मुलाकडून गोळीबार; मुंढव्यातील हॉटेलमधील घटना | पुढारी

सेवानिवृत्त एसीपीच्या मुलाकडून गोळीबार; मुंढव्यातील हॉटेलमधील घटना

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सेवानिवृत्त पोलिस अधिकार्‍याच्या (एसीपी) मुलाने मुंढव्यातील अनवाइंड नावाच्या हॉटेल परिसरात गोळीबार केल्याची घटना रविवारी घडली. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नाही.  या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पिस्तूल जप्त केले आहे. विजय शरद माने (वय 43, रा. पाषाण) असे गोळीबार करणार्‍याचे नाव आहे. याबाबत पोलिस कर्मचारी संतोष जगताप यांनी फिर्याद दिली आहे. हॉटेलमध्ये आलेल्या एका व्यक्तीसोबत झालेल्या वादातून माने याने हा गोळीबार केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय माने हा रविवारी (दि.11) सकाळच्या वेळी मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेला होता. तेथे त्याचा एका व्यक्तीसोबत किरकोळ कारणातून वाद झाला. त्या वेळी विजय याने त्याच्याकडील पिस्तूल बाहेर काढून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली. हॉटेलमध्ये भल्या सकाळी हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. त्यानंतर तेथून माने निघून गेला होता. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी विजय माने याने त्याच्या इतर साथीदारासह मुंढव्यात राडा करीत दोघांना मारहाण केली होती. याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर आता गोळीबारप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

…असा आला प्रकार उजेडात
विजय माने हा गोळीबार केल्यानंतर तेथून निघून गेला होता. तसेच त्याने हॉटेलमधील कर्मचार्‍यांना धमकी दिल्याने गोळीबाराबाबत कोणी वाच्याता केली नाही. दरम्यान, गोळीबाराचा हा प्रकार गुन्हे शाखेतील एका अतिवरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या कानावर आला होता. त्यांनी याबाबत गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस ठाण्याच्या पथकाला चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानुसार तपास केला असता, गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी माने याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्याकडील परवाना असलेले पिस्तूल जप्त केले आहे.

पोलिसांनी हॉटेलमधील कर्मचार्‍यांकडे चौकशी केली. त्या वेळी त्यांनी सांगितले, की आमच्या हॉटेलमध्ये नेहमी येणारा ग्राहक माने हा रविवारी आला होता. त्याने ड्रिंक व स्नॅक्स घेतल्यानंतर तो बाहेर जाऊन बसला. मात्र, काही वेळांतच मोठा ठो… असा आवाज आला. त्यामुळे आम्ही बाहेर जाऊन पाहिले तेव्हा माने हा हातात पिस्तूल घेऊन उभा असलेला दिसला. आम्ही त्याला काय झाले, असे विचारले तर  त्याने पिस्तुलातून गोळी झाडल्याचे सांगितले. तसेच कोणाला काही सांगितले, तर तुझ्याकडे बघून घेईन, अशी धमकी दिली. त्यामुळे हा प्रकार समोर आला नव्हता.

हॉटेल रात्रभर सुरू?
गोळीबार करून दहशत निर्माण केल्याच्या घटनेने हॉटेल परिसरात खळबळ उडाली होती. मध्यरात्री तेथे गेल्यानंतर सकाळी ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हे हॉटेल रात्रभर सुरू होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button