पुणे : विवाहितेची लग्नानंतर 3 महिन्यांत आत्महत्या | पुढारी

पुणे : विवाहितेची लग्नानंतर 3 महिन्यांत आत्महत्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पतीकडून होणार्‍या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेने लग्न झाल्यापासून अवघ्या तीन महिन्यांत गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी सत्यनारायण घनश्यामदास वैष्णव (वय 25, रा़ शहाद्र, छोटा बाजार, जुनी दिल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अरुणा सत्यनारायण वैष्णव (वय 26, रा. खराडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

श्रावणपाटीसाठी माहेरी पुण्यात आल्यानंतर अरुणा यांनी आत्महत्या केली. ‘आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी व घरातील कामे करण्यासाठी तुझ्याबरोबर लग्न केले,’ असे सांगून दुसर्‍या तरुणीबरोबर राहून पती अरुणा यांचा मानसिक व शारीरिक छळ करीत होता. याबाबत सुगनादेवी गोपालदास रांका (वय 46, रा. चौधरीवस्ती, खराडी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यनारायण व अरुणा यांचा विवाह 10 जून 2022 रोजी झाला होता. सत्यनारायण याचे दिल्लीत इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे. त्याचे आई-वडील राजस्थानला राहतात. सत्यनारायण याचे दुसर्‍या मुलीबरोबर संबंध होते. त्याविषयी अरुणा हिने विचारणा केली. तेव्हा सत्यनारायण याने मारहाण केली. दरम्यान, श्रावण महिना सुरू झाल्याने अरुणाला वडिलांनी पुण्यात माहेरी आणले. त्यावेळी फोनवर तिच्या पतीने सासरी आणणार नसल्याचे सांगितल्याने वारंवार होणार्‍या त्रासाला कंटाळून अरुणाने मंगळवारी गळफास घेऊन स्वतःला संपविले.

‘आत्महत्येला पती जबाबदार’
अरुणा आणि सत्यनारायण यांचे फोनवर बोलणे होत असे. आई-वडिलांची राजस्थानला जाऊन सेवा कर, असे तो तिला सांगत होता. त्यावरून त्यांच्यात भांडणे झाली होती. त्यानंतर अरुणा हिने चिठ्ठी लिहिली. त्यात तिने आपल्या आत्महत्येस फक्त आणि फक्त पती हाच जबाबदार असल्याचे लिहून आत्महत्या केली. पोलिसांना ही चिठ्ठी मिळाली असून, त्यामध्ये पतीच्या नावाचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Back to top button