

राजेंद्र खोमणे
नानगाव : दौंड तालुक्यातील भीमा नदीपट्ट्यातील व परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुर्हाळ घरांचा व्यवसाय जोरात सुरू आहेत. या गुर्हाळ घरांवर जळणासाठी प्लास्टिक, रबर, टायर, चामडे असे प्रदूषण करणार्या वस्तू सर्रासपणे वापरण्यात येतात, मात्र यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे प्रदूषण होऊन परिसरातील नागरिकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.
या भागात मोठ्या प्रमाणावर उसाची शेती असल्याने पूर्वीपासून या भागात गुर्हाळ व्यवसाय सुरू आहेत. पूर्वी गुर्हाळांचे प्रमाण कमी होते. शेतकरी स्व:त पूर्वी गुर्हाळ व्यवसाय करीत होते. त्यामुळे जळणासाठी उसाच्या चोतर्या वापरण्यात येत होत्या, त्यामुळे धुराचे प्रदूषण कमी प्रमाणात होत होते. तसेच, गूळ बनविण्यासाठी भेंडी वापरण्यात येत होती, त्यामुळे गूळही चांगला होत होता.
मात्र, गेली काही वर्षांपासून गावागावांत मोठ्या प्रमाणावर गुर्हाळांची संख्या वाढली असून, गावातील शेतकरी ही गुर्हाळे परप्रांतीयांना चालविण्यासाठी देत आहेत, हे परप्रांतीय कशाचीही पर्वा न करता गुर्हाळांवर सर्रास प्लास्टिक, रबर, टायर इत्यादी वस्तू जाळण्यासाठी वापरत असून, गुर्हाळ परिसरात मोठमोठे ढीग लागलेले दिसून येत आहेत. बाहेर राज्यातून, तसेच वेगवेगळ्या भागांतून अशा प्रकारचे प्रदूषण होणार्या वस्तू जळणासाठी मागवून घेतल्या जातात.
जळणासाठी चोतर्यांचे प्रमाण कमी आणि प्रदूषण होणार्या वस्तू जास्त वापरल्याने गुर्हाळांच्या धुराड्यामधून काळाकुट्ट व विषारी धुरांचे लोटच्या लोट निघत आहेत. या धुरात शरीरावर परिणाम करणारे वेगवेगळे घटक असल्याने मानव, प्राणी, पक्षी, शेती या घटकांवर वाईट परिणाम होत आहे. गुर्हाळ परिसरातील नागरिकांना डोळ्यांचे, श्वसनाचे, फुफ्फुसांचे आजार उद्भवत असून, या आजारांनी त्रस्त असलेले नागरिक दवाखान्यात हजारो रुपये खर्च करताना दिसत असल्याची तक्रार या भागात नागरिक करीत आहेत.
खोकला, दम लागणे व डोळ्यांच्या आजाराने ज्या प्रमाणे नागरिक त्रस्त आहेत त्याचप्रमाणे शेती व्यवसायदेखील अडचणीत आला आहे. भाजीपाला व फळबागांवर या विषारी धुराचा मोठा वाईट परिणाम होताना दिसत असल्याचे जाणकार शेतकरी बोलून दाखवितात. या प्रदुूषित धुरामुळे मधमाश्यांची संख्या कमी होत असल्याने परागीभवन होत नाही. त्यामुळे उत्पादन घटल्याचेही शेतकरी बोलून दाखवितात.
विषारी धुराचा परिणाम शेतपिकांवर देखील होत आहे. शेतातील पिकांवर, तसेच परिसरातील वेगवेगळ्या वनस्पतींच्या पानांवर धुराचा थर दिसून येत आहे. घरांच्या भिंती आणि वाळवत घातलेल्या कपड्यांवरदेखील धुराचे थर दिसून येतात. मोठ्या प्रमाणात कामगार असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. गुर्हाळासाठी वापरण्यात येणारे पाणी, उसाच्या आधणावरील मळीचे पाणी, परिसरात साठलेले पाणी, शौचालये नसलेल्या ठिकाणी असणारे घाणीचे साम्राज्य इत्यादी गोष्टीमुळेदेखील परिसरात रोगराई पसरत असते.
मोठ्या प्रमाणावर होणारे गुर्हाळातील प्रदूषण मानवासह पक्षी, प्राणी व वनस्पती यांच्यावरदेखील होताना दिसत आहे. सध्याच्या काळातील प्रदूषणाची वाढती परिस्थिती चिंता वाढविणारी आहे. या प्रदूषण करणार्या गुर्हाळांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी गुर्हाळ परिसरातील नागरिक करीत आहेत. जर धुराच्या प्रदूषणाचा प्रश्न सुटला नाही, तर पुढील काळात नागरिकांना मोठमोठ्या आजारांना सामोरे जावे लागणार असल्याची वस्तुस्थिती आहे.
कसलीच कारवाई होत नाही
गुर्हाळ मुळे होणार्या प्रदूषणामुळे अनेकदा ग्रामपंचायत प्रशासन व गुर्हाळ जागामालक यांच्याकडे तक्रार करूनही यावर कसलीही कारवाई होत नाही. उलट गुर्हाळ मालक व परिसरातील नागरिक यांच्यातच अनेकदा तू..तू..मैं..मैं होताना दिसत आहे.
लोकवस्तीत पसरतो धूर
गुर्हाळ व्यवसाय मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती परिसरात दिसून येतो. तसेच, गुर्हाळांची धुराडीदेखील छोट्या आहेत. त्यामुळे धुराड्यामधून निघणारा धूर वरच्या हवेत न जाता तो खालच्या हवेतच थांबून लोकवस्तीत पसरत असतो. त्यामुळे याचा जास्त धोका वाढत चालला आहे.