पुणे : पालिकेच्या बेशिस्त कर्मचार्‍यांना दणका; 157 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस | पुढारी

पुणे : पालिकेच्या बेशिस्त कर्मचार्‍यांना दणका; 157 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कार्यालयीन वेळेत कामचुकारपणा करणार्‍या आणि वेळेवर कार्यालयात उपस्थित न राहणार्‍या 157 बेशिस्त कर्मचार्‍यांना महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने अखेर दणका दिला आहे. या कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असून, दोन दिवसांत खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाने शासकीय कार्यालयांच्या कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केल्यानंतर कामाचे तास वाढविले होते.

त्यामुळे कर्मचारी व अधिकार्‍यांनी 9.30 पूर्वी कार्यालयात येणे व 6.30 नंतर घरी जाणे अपेक्षित होते. मात्र, अनेक अधिकारी व कर्मचारी आपल्या वरिष्ठांना कसलीही कल्पना न देता केव्हाही कार्यालय सोडणे, सकाळी उशिरा कार्यालयात येणे आणि सायंकाळी पाचपासूनच घराची वाट धरणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढलेली होती. तसेच, दुपारी जेवणाची सुटी झाल्यानंतर अनेक महिला कर्मचारी कार्यालय सोडून नवीन विस्तारित इमारत आणि महापालिका भवनाच्या परिसरात तासन् तास फिरत असल्याचे चित्र दररोज दिसत होते. यासंदर्भात दैनिक ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासनाने कर्मचारी केव्हा कार्यालयात येतात, केव्हा बाहेर जातात, यावर लक्ष ठेवण्याचे विभागप्रमुखांना आदेश दिले आहेत. मात्र, त्याचा फारसा प्रभाव दिसत नसल्याने कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला होता. याचाच एक भाग म्हणून कर्मचारी आणि अधिकारी आपल्या कार्यालयात हजर आहेत, नाहीत, याची खातरजमा करण्यासाठी दिवसातून तीनवेळा तपासणी करणे, उशिरा येणारे आणि लवकर घरी जाणार्‍यांचे प्रवेशद्वारावर चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी कार्यालयीन वेळेत महापालिकेत न येणार्‍या 157 कर्मचार्‍यांना प्रवेशद्वारावर कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या. यासाठी सामान्य प्रशासन आणि सुरक्षा विभागाच्या कर्मचार्‍यांची टीम तैनात करण्यात आली होती. या कर्मचार्‍यांनी दोन दिवसांत खुलासा करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

Back to top button