पुणे : गणेशोत्सवामुळे धार्मिक पर्यटन बहरले; देशभरातूनही पर्यटकांनी उत्सव काळात गाठले पुणे | पुढारी

पुणे : गणेशोत्सवामुळे धार्मिक पर्यटन बहरले; देशभरातूनही पर्यटकांनी उत्सव काळात गाठले पुणे

पुणे; पुढारी वृत्तसेवा: यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा झाल्यामुळे देशविदेशातील पर्यटकांनी पुण्यातील गणेशोत्सव पाहिला. मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांसह इतर गणपती मंडळांना देशविदेशातील पर्यटकांनी भेट दिली अन् त्यामुळे पुण्यातील धार्मिक पर्यटनालाही चालना मिळाली. अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, थायलंड आदी देशांतून, तसेच गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, पंजाब आदी राज्यांतून हजारो पर्यटकांनी गणेशोत्सवाच्या काळात पुणे गाठले अन् गणेशोत्सवाचा रंग अनुभवला.

पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. येथील धार्मिक स्थळांचा नावलौकिक जगभर आहे. पण, कोरोनामुळे धार्मिक पर्यटनाला फारसी चालना मिळत नव्हती. पर्यटकांच्या कमतरतेमुळे धार्मिक पर्यटनाला आर्थिक फटका बसला. पण, यंदाच्या वर्षी धार्मिक पर्यटन बहरले आहे. खासकरून गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा झाल्याने देशविदेशातून पर्यटक पुण्यात आले. मंडळांचे देखावे पाहण्यासह त्यांनी गणरायाचे दर्शनही घेतले, संस्कृती जाणून घेतली, तर यामुळे धार्मिक पर्यटनावर उदरनिर्वाह अवलंबून असणार्‍या व्यावसायिकांनाही त्याचा फायदा झाला. तसेच, धार्मिकस्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या.

याशिवाय आता गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव आणि इतर सण-उत्सव असल्याने धार्मिक पर्यटन आणखी बहरणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, की दोन वर्षे साधेपणाने गणेशोत्सव साजरा झाला. त्यामुळे देशविदेशातील पर्यटकांना उत्सवात येण्याची संधी मिळाली नाही. पण, यंदाच्या वर्षी मात्र पर्यटकांनी दहाही दिवस गणेशोत्सवाचा रंग अनुभवला आणि त्यामुळे पुण्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळाली.

हजारो पर्यटकांनी उत्सव काळात श्रीमंत दगडूशेठ गणपतीला भेट दिली. खासकरून थायलंडहून आलेल्या परदेशी पर्यटकांची संख्या अधिक होती. देशभरातून अनेक पर्यटक दर्शनासाठी आले होते. श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे प्रशांत टिकार म्हणाले, की दोन वर्षांनंतर पुण्यातील धार्मिक पर्यटनाला उत्सव काळात नवसंजीवनी मिळाली आहे. मंडळाला देशविदेशातील पर्यटकांनी भेट दिलीच. पण, उत्सवाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Back to top button