पुणे : बालमृत्यू पाच हजारांनी घटले; पाच वर्षांतील दिलासादायक आकडेवारी | पुढारी

पुणे : बालमृत्यू पाच हजारांनी घटले; पाच वर्षांतील दिलासादायक आकडेवारी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गर्भवती महिलांमधील रक्तक्षय नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेले औषधोपचार, सकस आहाराबाबत जनजागृती, स्तनपानाबाबतचा आग्रह आणि कुपोषणावर मात करण्यासाठी उपाययोजना, अशा विविध कारणांमुळे राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण दरवर्षी घटत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. पाच वर्षांत बालमृत्यूचे प्रमाण जवळपास पाच हजारांनी कमी झाले आहे.

सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हेनुसार भारताचा नवजात शिशू मृत्यूदर हा 22 तर महाराष्ट्र राज्याचा नवजात शिशू मृत्यूदर हा 13 आहे. तसेच 5 वर्षांखालील बालमृत्यूचा दर देशाचा 35 असून महाराष्ट्राचा 21 आहे. तसेच देशाचा अर्भक मृत्यूदर 28 असून महाराष्ट्राचा 16 इतका आहे. केरळमधील बालमृत्यू दर सर्वात कमी आहे. त्यामागोमाग दिल्ली, तमिळनाडू आणि महाराष्ट्रात मृत्यूदर कमी आहे.

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत बाल आरोग्य कार्यक्रम आणि सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणणे शक्य झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. नवजात शिशू स्थिरीकरण कक्ष, जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान व नवसंजीवनी योजना याद्वारे मृत्यूदर कमी करण्यात यश येत आहे.

बाळ जन्मल्यापासून 30 दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास त्याला अर्भक मृत्यू असे म्हणतात. जन्मापासून वर्षभरात झालेल्या मृत्यूला बालमृत्यू असे म्हणतात. मात्र, ही आकडेवारी सातत्याने घटत असल्याचे दिसून आले आहे. सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हेच्या गेल्या काही वर्षांच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत बाल आरोग्य कार्यक्रम आणि सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणणे शक्य झाले आहे. राज्यात बालमृत्यू कमी करण्यासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

                                                – डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य संचालक

बालमृत्यूदराची आकडेवारी
सन बालकांची संख्या
2017-18 20105
2018-19 20084
2019-20 19185
2020-21 16951
2021-22 16714

Back to top button