

लोणावळा, पुढारी वृत्तसेवा: दोन महिन्यांपूर्वी लोणावळ्यातील एका बंगल्यातील अनधिकृत स्विमिंग पुलमध्ये बुडून एका दोन वर्षीय चिमुरड्याचा करुण अंत झाला होता, तर त्यानंतर दोनच दिवसांनी अपुर्या सुरक्षेअभावी स्विमिंगपूलमध्ये खेळल्यानंतर ओल्या अंगाने शेजारच्या लाईटच्या खांबाला हात लावल्यामुळे एका 13 वर्षाच्या मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला होता. अशा लागोपाठ दोन घटना घडल्यानंतर अॅक्शन मोडमध्ये आलेल्या लोणावळा नगर परिषदेने अशा अनधिकृत स्विमिंग पुलचा सर्व्हे सुरू केला. मात्र, त्यानंतर आतापर्यंत त्या सर्व्हेचे काय झाले, यासंदर्भात स्पष्ट माहिती अद्यापि पुढे आलेली नाही.
मागील जुलै महिन्यात वरील दोन्ही घटना घडल्यानंतर लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी नगर परिषद अधिकार्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत नगर परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या टीम बनवून दोन दिवसांत शहरातील प्रत्येक भागात असलेल्या बंगल्यात तसेच रो हाऊसमध्ये बांधण्यात आलेल्या स्विमिंग पुलचा सर्व्हे करून ते अधिकृत आहे की अनधिकृत आहे? याचा अहवाल सादर करण्याबाबतचा आदेश दिला होता.
लोणावळा शहरात पर्यटकांना खासगी बंगले भाड्याने देण्याचा एक मोठा ट्रेंड सध्या सुरू आहे. येथे येणारे बहुतेक पर्यटक हे हॉटेलपेक्षा अशा खासगी बंगल्यांना जास्त पसंती देतात. मात्र, त्यातही ज्या बंगल्यात जलतरण तलाव आहे असे बंगले प्राधान्यक्रमाने आणि जास्त पैसे देऊन बुक केले जातात. त्यामुळे बंगले भाड्याने देणार्या बंगलेधारकांकडून आपल्या बंगल्याच्या किंवा रो हाऊसच्या आवारात ज्या ठिकाणी मोकळी जागा मिळेल तेथे अक्षरशः हवा तसा खड्डा खणून जलतरण तलाव तयार केला जातो आहे.
व्यवसायाची गरज म्हणून बंगलेधारकांकडून बांधण्यात येत असलेल्या या स्विमिंग पुलबाबत कोणत्याही स्वरूपाचा डाटा आतापर्यंत नगर परिषदेकडे उपलब्ध नव्हता. सर्व्हेनंतर आकडेवारी नगर परिषदेकडे उपलब्ध झाली आहे. मात्र, स्विमिंग पूल बाबतीतल्या सुरक्षा मानकांच्या संदर्भात खुद्द नगर परिषद प्रशासनाकडे अद्यापी अस्पष्टता दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेमधून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, अनधिकृत स्विमिंग पुलवर कारवाई करण्याचा तसेच स्विमिंग पूल बांधकाम नियमांमध्ये स्पष्टता आणण्याचा निर्णय मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी घेतला आहे. शिवाय या सर्व स्विमिंग पूलधारकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहितीदेखील मिळत आहे. त्यामुळे पुढील काळात किती अनधिकृत स्विमिंग पूलवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे हे बघणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
शहरात 997 स्विमिंग पूल
या आदेशानुसार करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये शहरात एकूण 997 स्विमिंग पूल असल्याचे समोर आले आहे, मात्र, त्यानंतर त्या सर्व्हेच पुढे काय झाले ?, किती स्विमिंग पुलवर कारवाई झाली ?, किती पूल अधिकृत करण्यासाठी अर्ज आले ? याचा काहीही लेखाजोखा पुढे आलेला नाही.