धक्कादायक: १३ वर्षीय अपंग आणि भोळसर मुलीवर बलात्कार, तिघांवर गुन्हा दाखल; महिला आरोपीस अटक | पुढारी

धक्कादायक: १३ वर्षीय अपंग आणि भोळसर मुलीवर बलात्कार, तिघांवर गुन्हा दाखल; महिला आरोपीस अटक

इंदापूर, पुढारी वृत्तसेवाः इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या १३ वर्षाच्या अल्पवयीन आणि अपंग मुलीवर बलात्कार केल्याची घटना इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील एका मोठ्या गावात घडली. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तिघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील महिला आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुभांगी अमोल कुचेकर ( वय २५, रा – चिखली फाटा लासुर्णे),अनिल नलवडे, नाना बागडे ( रा.दोघे,गोतोंडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

शुभांगी कुचेकर हिला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल केला आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील एका मोठ्या गावातील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या अपंग आणि भोळसर मुलीला नोेंव्हेबर २०२१ मध्ये शुंभागी कुचेकर हिने गाेड बोलून फिरायला नेले होते. गाडीमधून आलेल्या अनिल नलवडे याच्याबरोबर उसाच्या शेतात संबंधित मुलीला पाठविल्याचा प्रकार घडला. एप्रिल २०२२ पर्यंत वेळोवेळी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. बलात्कारासाठी शुंभागी कुचेकर व नाना बागडे यांनी सहकार्य केल्याचे उघडकीस आले.

गेल्या काही दिवसांपूर्वी संबधित मुलीच्या पोटात दुखत असल्याने तपासणीसाठी बारामतीमधील हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ती गरोदर असल्याचे समजले. यानंतर मुलीच्या आईने वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे आणि पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे करीत आहेत.

Back to top button