भवानीनगर : पाणी साचल्याने ऊसाच्या लागण्यांचे नुकसान | पुढारी

भवानीनगर : पाणी साचल्याने ऊसाच्या लागण्यांचे नुकसान

भवानीनगर, पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचे पाणी उसाच्या लागणीत साचून लागणींचे नुकसान होऊ लागले आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेली 15 ते 20 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून, या पावसामुळे जमिनीमध्ये पावसाचे पाणी मुरण्याची पातळी संपली आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उसाच्या पिकाच्या सर्‍यांमध्ये पावसाचे पाणी साचू लागले आहे. श्री छत्रपती कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांना उसाच्या लागणी करण्यासाठी जुलै महिन्यापासून परवानगी दिल्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अनेक ऊस उत्पादक सभासदांनी उसाच्या लागणी केल्या आहेत. या उसाच्या लागणींमध्ये पावसाचे पाणी साचू लागल्यामुळे ऊस पिकाला फटका बसू लागला आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाळ्यातील ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाचे प्रमाण कमी होते, परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये सलग पाऊस सुरू आहे. पावसाचे पाणी उसाच्या लागणीत साचत असल्यामुळे ते बाहेर काढून दिले आहे. परंतु तरीही वरील शेतातील पाणी पाझरून खालच्या शेतात येत असल्यामुळे उसाच्या सर्‍यांमध्ये पाणी साचून राहत आहे. पाणी साचून राहिल्याने उसाच्या लागणी पिवळ्या पडू लागल्या असून लागणीमध्ये फुटवे निघणे बंद झाले आहे.

शेतकर्‍यांवर दुबार उसाची लागण करण्याची वेळ आली आहे, असे मत शेतकर्‍यांमधून व्यक्त होऊ लागले आहे. श्री छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गेल्यावर्षी आतापर्यंत 258 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली होती, परंतु यावर्षी 581 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

Back to top button