डॉक्टरांच्या रूपात देवच ! मुसळधार पावसात पायपीट करून शस्त्रक्रिया, गर्भवती महिला, बालकास जीवदान | पुढारी

डॉक्टरांच्या रूपात देवच ! मुसळधार पावसात पायपीट करून शस्त्रक्रिया, गर्भवती महिला, बालकास जीवदान

रघुनाथ कसबे :

बिबवेवाडी : वाहतूक कोंडीत अडकल्याने डॉक्टरांनी मुसळधार पावसात तीन किलोमीटरची पायपीट करून धायरी येथील एका रुग्णालयात गर्भवती महिलेची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. यामुळे या महिलेला व बालकाला जीवदान मिळाले. डॉक्टरांनी दाखविलेल्या या प्रसंगावधनाचे कौतुक होत आहे. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी सायंकाळी साडेसातची वेळ, भूलतज्ज्ञ डॉ. विशाल भंडारी बालाजीनगर येथील आपल्या रुग्णालयात बसले होते. त्यावेळी धायरी येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अभिजित निकम यांचा त्यांना फोन आला. त्यांनी गर्भवती महिलेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी धायरी येथे रुग्णालयात येण्याची विनंती डॉ. भंडारी यांना केली. सोबत बालरोग तज्ज्ञांनाही घेऊन येण्यास सांगितले.

गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. भंडारी हे बालरोग तज्ज्ञ डॉ. सुशील पाटील यांना घेऊन तातडीने धायरीला जाण्यासाठी बालाजीनगरहून मोटारीने निघाले. कात्रज चौकातून धायरीकडे जात असताना अभिनव महाविद्यालय परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यातून किमान एक तास तरी गाडी निघणे अशक्य असल्याचे डॉ. भंडारी व डॉ. पाटील यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली व पायी धायरीत रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. गाडीत असलेली छत्री घेऊन ते पावसातून धायरीच्या दिशेने पायी चालत निघाले.

नवले पुलाजवळ आल्यानंतर आणखी जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र, जराही न थांबता जवळपास तीन किलोमीटरची पायपाट करून ते धायरीतील संबंधित रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर त्यांनी गर्भवती महिलेवर सिझेरियन शस्त्रक्रिया करून तिची प्रसूती केली. त्यामुळे आई व बाळाचे प्राण वाचल, असे डॉ. निकम यांनी सांगितले.

आमच्या कुटुंबासाठी हा अतिशय कठीण काळ होता. डॉक्टरांच्या प्रसंगावधनामुळे माझी पत्नी व बाळाचा पुनर्जन्मच झाला आहे. डॉक्टरांचे हे ऋण मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.
                                                     – गणेश मांडे, बाळाचे वडील.

धायरी येथील डॉ. अभिजित निकम यांचा फोन आल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून आम्ही मोटारीने धायरीकडे निघालो. वाटेत वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, आम्ही क्षणाचाही विलंब न करता गाडी रस्त्याच्या बाजूला लावून पायी चालत धायरीतील रुग्णालयात जाऊन गर्भवती महिलेवर शस्त्रक्रिया केली.
                                                    -डॉ. विशाल भंडारी, भूलतज्ज्ञ

Back to top button