डेंग्यू, चिकुनगुनिया, स्वाईन फ्लू : पुण्यात जास्त संसर्ग | पुढारी

डेंग्यू, चिकुनगुनिया, स्वाईन फ्लू : पुण्यात जास्त संसर्ग

पुढारी ऑनलाईन डेस्क : डेंग्यू आणि चिकुनगुनियाची साथ पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक वेगाने वाढत आहे. याचे प्रमुख कारण बदलते हवामान असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानात झालेला मोठा बदल पुणे शहरातील वाढत्या संसर्गाला कारणीभूत आहे. तसेच एच वन -एन वन विषाणूचाही प्रादुर्भाव वाढल्याने स्वाईन फ्लूचेही रुग्ण वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

पुण्याचे टाकले मुंबईलाही मागे
आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, पुण्यात एच वन-एन वन, डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची जास्त संख्या नोंदवण्याचे प्रमुख कारण म्हणजे जिल्ह्यातील हवामान आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यात जास्त प्रकरणे नोंदवली आहेत. कारण, सध्या जे उष्ण आणि दमट वातावरण आहे. डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रसार एडिस प्रजातीच्या डासांमुळे होतो. तर मलेरियाचा प्रसार अ‍ॅनोफिलीस डासांमुळे होतो. मुंबई, चेन्नई, अधिक गजबजलेल्या आणि दमट असलेल्या भागात हे प्रमाण जास्त असते. मंगळुरूमध्ये सामान्यत: मलेरियाचे प्रमाण जास्त असते.

कमाल व किमान  तापमानात बदल
पुण्यासारख्या ठिकाणी डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव तुलनेने जास्त आहे कारण, जिल्ह्यात दिवसा आणि रात्रीच्या तापमानात लक्षणीय फरक आहे. कमाल तापमान 31 ते 32 अंशांवर गेले आहे, तर किमान तापमान 21 ते 23 अंशांवर आहे. सध्या पाऊस पडत असल्याने किमान व कमाल तापमानात मोठा फरक झाला आहे. दिवसा कडक ऊन, तर रात्री थंडी व पाऊस असे वातावरण पुणे शहरात आहे.

श्वसनाचे  आजार वाढले
पुणे शहरात दिवसा कडक ऊन तर सायंकाळी पाऊस पडतो आहे. त्यामुळे दमट वातावरण वाढल्याने श्वसनाचे विकार वाढले आहेत. शिवाय शहरातील वाहन प्रदूषणात मोठी भर पडल्यानेही श्वसनाचे विकार वाढले आहेत. डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या बाबतीत, विशिष्ट हवामानामुळे डासांची पैदास वाढत आहे.

स्वाईन फ्लूचे सर्वाधिक मृत्यू
या वर्षात महाराष्ट्रात स्वाईन फ्लूमुळे सर्वाधिक मृत्यू पुणे जिल्ह्यात झाल्याचेही राज्याच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. जिल्ह्यात 36 मृत्यूची नोंद झाली असून, त्यापाठोपाठ कोल्हापूर, नाशिक आणि ठाण्यात प्रत्येकी 15 मृत्यूची नोंद झाली आहे. अहमदनगर आणि नागपूरमध्ये प्रत्येकी 11 मृत्यूची नोंद
झाली आहे, त्यानंतर सातारा (10), सांगली (4) आणि मुंबई (3) आहेत.

असा वाढतोय संसर्ग
डेंग्यू
पुणे जिल्हा : 643 रुग्ण
कोल्हापूर ः 443 रुग्ण
मुंबईः 382 रुग्ण
ठाणे ः 344 रुग्ण
चिकुनगुनिया
पुणे जिल्हा ः 229 रुग्ण
कोल्हापूरः 150 रुग्ण
सांगली ः 36 रुग्ण
सातारा ः 29 रुग्ण

स्वाईन फ्लू
पुणे ः 540 रुग्ण
मुंंबईः 345 रुग्ण
ठाणे ः 327 रुग्ण
स्वाईन फ्लूचे मृत्यू :
पुणे जिल्हा ः 36
कोल्हापूर ः 15 । नाशिक ः 15
ठाणे : 15 । नगर :11
नागपूर 11 । सातारा 10
सांगली : 4 । मुंबई : 3
मुंबईः 11 रुग्ण

पुणे जिल्ह्याचे वातावरण राज्यातील इतर भागांपेक्षा वेगळे आहे. भरपूर पाऊस, दमट व उष्ण वातावरणात स्वाईन फ्लूसह इतर विषाणूंच्या वाढीस पोषक असते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप आला तर अंगावर काढू नये. तत्काळ डॉक्टरला दाखवले पाहिजे. तसेच अशा रुग्णांनी इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून काही दिवस विलगीकरणात राहावे व सतत मास्क वापरावा. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने डेंग्यू, चिकुनगुनियाचा संसर्ग होत आहे. जसा स्वाईन फ्लू आहेच, तसा कोरोना राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.
                                   – डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे

Back to top button