

प्रज्ञा केळकर-सिंग :
पुणे : महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षाच्या दुसर्या तुकडीचे प्रवेश लवकरच सुरू होणार आहेत. मात्र, अद्याप दुसर्या वर्षाचे वर्ग नायडू रुग्णालय परिसरात स्थलांतरित होण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. नायडू रुग्णालयात वर्ग सुरू झाल्यावरही वर्ग एकीकडे, सराव दुसरीकडे आणि वसतिगृह तिसरीकडे अशी कसरत विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.
महापालिकेला वैद्यकीय महाविद्यालयाची केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यावर 7 मार्च रोजी 100 जागांवर प्रवेश करण्यास केंद्र शासनाकडून मान्यता देण्यात आली. सध्या कमला नेहरू रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या बाबूराव सणस शाळेमध्ये महाविद्यालयातील पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वर्गखोल्या, प्रयोगशाळा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेवर दुसर्या वर्षाचे वर्ग भरणार आहेत. तेथे या वर्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. 'नॅशनल मेडिकल कमिशन'ने अचानक भेट दिल्यास अपुर्या कामातील त्रुटी पथकाकडून दाखवल्या जाऊ शकतात.
विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या भवितव्याबाबत महापालिकेला गांभीर्य कधी निर्माण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नायडू रुग्णालयात अद्याप वर्गखोल्या आणि प्रयोगशाळांचे काम पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण झाल्यावर नायडू रुग्णालयात वर्गखोल्या, वैद्यकीय सरावासाठी कमला नेहरू रुग्णालय आणि वसतिगृह सणस मैदान अशा तिन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागणार आहे. महाविद्यालयाचे नियोजन करताना नायडू रुग्णालयाच्या आवारामध्ये स्वतंत्र इमारत, वसतिगृह तसेच इतर सुविधा उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. पण, ते प्रत्यक्षात कधी येणार, याची वाट पाहावी
लागणार आहे.