निगडी आगारास चार लाखांचा फटका | पुढारी

निगडी आगारास चार लाखांचा फटका

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरात रविवारी झालेल्या पावसाने वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे ई-बसेसचे चार्जिंग होऊ न शकल्याने सुमारे 70 ई-बसेस नेहमीप्रमाणे मार्गावर धावल्या नाहीत. परिणामी प्रवाशांचे हाल झाले; तसेच निगडी आगाराचे सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. याबाबत अधिक माहिती घेतली असता डीसी चार्जर आणि चार्जिंग स्टेशनचा अद्यापही तुटवडा असल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. निगडी येथे ई-बस चार्जिंग करण्यासाठी 32 साधे चार्जर तर एकच डीसी चार्जर आहे. डीसी चार्जरचे प्रमाण अधिक असणे गरजेचे आहे. तसेच येथील चार्जिंग स्टेशनवर एका वेळी 32 बसेस चार्ज केल्या जातात; मात्र इतर बसेसना चार्ज करण्यासाठी थांबावे लागते. त्यामुळे या आगारात आणखी चार्जिंग स्टेशनची गरज आहे.

काय आहे डीसी चार्जर
डीसी चार्जरद्वारे ई-बस अर्ध्या तासात चार्ज होऊन, मार्गावर धावू शकते. तर साध्या चार्जरद्वारे किमान अडीच तास एका बससाठी वेळ लागतो. निगडी येथे बर्‍या दिवसांपासून नवीन चार्जिंग स्टेशनचे काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

आर्थिक फटका
शुक्रवार, शनिवार व रविवार अशा सलग सुट्या होत्या. यानंतर सोमवारी एकदम प्रवाशी संख्या वाढल्याने किमान नेहमीपेक्षा अधिक उत्पन्न जमा झाले; मात्र ई-बस बंद असल्याने निगडी डेपोचे किमान चार लाखांचे नुकसान झाले आहे.

सुरू असलेल्या चार्जिंग स्टेशनला चिंचवड महावितरण विभागातून वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे दुसर्‍या नव्याने होत असलेल्या चार्जिंग स्टेशनला बिजलीनगर येथून वीजपुरवठा होणार आहे. भविष्यात चिंचवड विभागातील वीजपुरवठा खंडीत झाल्यास बिजलीनगर येथून वीजपुरवठा सुरळीत केला जाईल; तसेच इलेक्ट्रिक बसला पर्याय म्हणून सीएनजी बसेस आहेत. आम्ही आपत्कालीन प्रसंगी इलेक्ट्रिक बसऐवजी सीएनजी बसचा वापर करू शकतो. त्यामुळे सोमवारी प्रवाशांची गैरसोय टळली होती.
-शांताराम वाघेरे, आगार व्यवस्थापक, निगडी डेपो.

Back to top button