धक्कादायक ! लोनॲपवरील कर्ज फेडण्यासाठी नातीने आजीचा केला खून | पुढारी

धक्कादायक ! लोनॲपवरील कर्ज फेडण्यासाठी नातीने आजीचा केला खून

पुणेः पुढारी वृत्तसेवा : लोनॲपवरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नातीने आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारजेतील आकाशनगर परिसरात झालेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या खुनाचा वारजे पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी रात्री उशीरा पोलिसांनी गौरी सुनील डांगे (वय २४) या नातीला ताब्यात घेतले आहे. तर सुलोचना सुभाष डांगे (वय.65,रा.शुभम कॉलनी लेन क्रमांक दोन) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी (दि.13) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार गौरी हिने लोनॲपद्वारे कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्यासाठी तिला तगादा लावण्यात येत होता. त्यातूनच तिने मंगळवारी सकाळी आजीचा खून करून घरात चोरी झाल्याचा बनाव रचला. आजी घरात एकटी असताना उशीने तोंड दाबून तिचा गळा घोटला. त्यानंतर हातावर वार केले. आजीचे सोने घेऊन तिने घराबाहेर पळ काढला होता. तपासादरम्यान पोलिसांना मुलगा आणि नातीवर संशय होत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पोलिस उपनरीक्षक नरेंद्र मुंढे यांच्या पथकाने मुलीकडे पोलिसी खाक्या दाखवून तपास केला असता. नातीने आजीच्या खुनाची कबुली दिली. लोनॲप वरुन घेतलेले कर्ज फेडण्यासाठी संबंधित व्यक्तीला अनेकदा ब्लॅकमेल करून त्यांची बदनामी केली जाते आहे. त्यातूनच हा गंभीर प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

Back to top button