जेजुरीला भूसंपादनाची सुळे यांनी केली पाहणी; महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकार्‍यांकडे प्रश्न मांडणार | पुढारी

जेजुरीला भूसंपादनाची सुळे यांनी केली पाहणी; महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकार्‍यांकडे प्रश्न मांडणार

जेजुरी, पुढारी वृत्तसेवा: नियोजित पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात जेजुरी शहरामध्ये असलेल्या असंतोषाची दखल घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (दि. 12) या रस्त्याची पाहणी केली. अन्यायग्रस्त नागरिक व महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन याप्रकरणी मार्ग काढला जाईल, असे सुळे यांनी सांगितले.

महामार्गाच्या सर्वेक्षण व मोजणीमध्ये अस्तित्वात असणार्‍या रस्त्याच्या मध्यभागातून दोन्ही बाजूला रुंदीकरणाच्या खुणा न करता केवळ उत्तरेकडील बाजूला करून केवळ एकाच बाजूची जागा अधिग्रहण करण्याचा प्रयत्न असल्याने जेजुरीतील नागरिक व व्यावसायिकांत संतापाचे वातावरण आहे.

पुरंदर तालुक्यातील अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खा. सुळे यांनी पुरंदर तालुक्यातील विविध गावांना भेट दिली. सायंकाळी त्यांनी या मार्गाची पाहणी केली. या रस्त्याच्या केवळ उत्तरबाजूची जागा अधिग्रहण करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. 2015 सालीही याच बाजूची घरे व दुकाने पाडण्यात आली होती. या जागा अधिग्रहणाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. अस्तित्वात असणार्‍या रस्त्याच्या मध्यातून दोन्ही बाजूला समांतर रस्ता करावा, अशी मागणी नागरिकांनी खा. सुळे यांच्याकडे केली.

2015 साली अधिग्रहण झाल्यानंतर कसलीही नुकसानभरपाई देण्यात आली नाही. आता पुन्हा राष्ट्रीय महामार्गासाठी केवळ उत्तेकडील जागा भूसंपादन केली जात आहे. जगणे अशक्य झाल्याने राष्ट्रपती यांच्याकडे इच्छामरणासाठी निवेदन दिल्याची या वेळी महिलांनी व्यथा मांडली. या वेळी जेजुरी पालिकेचे विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, विजय झगडे, रियाज पानसरे, सागर काकडे, हरिभाऊ काकडे, रामभाऊ काकडे, गणेश खोमणे, अतुल खोमणे, संदीप खोमणे, आयुब पानसरे उपस्थित होते.

Back to top button