पळसदेव परिसरात साथीच्या आजाराची लागण, अधिकार्यांचे दुर्लक्ष; रुग्णांचे हाल

पळसदेव, पुढारी वृत्तसेवा: पळसदेव परिसरात डेंग्यूसह साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरलेले असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. विचारणा केली तर तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? तुमच्यावर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलिसात तक्रार देऊन कारवाई करेन, अशी धमकी देण्यात येते. स्वतः मात्र कर्मचारी वेळेत आरोग्य केंद्रात उपस्थित राहत नाहीत. यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. येथील शासकीय रुग्णवाहिकेचा स्वतःच्या कामासाठी मनमानी पद्धतीने वापर सुरू आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला सोमवारी (दि. 12) पळसदेवचे सरपंच, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य यांनी अचानक भेट देऊन पत्रकारांसमोर येथील मनमानी कारभाराचा पाढाच वाचला.
पळसदेव प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्यातील इंदापूर, भिगवणनंतर महामार्गावरील सर्वांत म्हत्त्वाचे केंद्र आहे. गेल्या काही दिवसांपासून पळसदेव परिसरात थंडी, ताप, खोकला, डेंग्यूसारख्या आजारांची साथ पसरली असून, खासगी दवाखान्यात रांगा लागल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी ईशा बंगेरा ह्यादेखील येथे 2 तासही येथे उपस्थित राहत नाहीत. तसेच कर्मचारी आठवड्यातून एक दिवस हजर राहून इतर दिवसासाठी रजिस्टरवर स्वाक्षर्या करून जात असल्याची तक्रार सरपंच इंद्रायणी मोरे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्य कैलास भोसले, अंकुश जाधव, रुग्णकल्याण समिती सदस्य अमोल मोरे, सुजित मोरे यांनी पत्रकारांसमोर केली आहे.
येथील काही कर्मचार्यांची निवासस्थाने नादुरुस्त होती. ती पंचायत समिती सदस्यांनी त्यांच्या निधीतून दुरुस्त करून दिली आहेत. तरीदेखील वैद्यकीय अधिकारी येथील निवासस्थानी राहत नाहीत. अधिकारी येथील निवासस्थानी राहत नसल्याने रात्री-अपरात्री बाळंतपणासाठी आलेल्या महिला अथवा महामार्गावर अपघात घडल्यास तत्काळ उपचार करण्याची आवश्यकता असते. परंतु, त्यांची अडचण होते.
मी कोणाशीही उद्धटपणे वागली नाही. शासकीय गाडीचा कोठेही स्वतःसाठी वापर केला नाही. कोणताही कर्मचारी रजेचा अर्ज केल्याशिवाय सुटी घेत नाही. ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे, तेथील स्वच्छता तत्काळ करून घेतली जाईल.
– डॉ. ईशा बंगेरा, वैद्यकीय अधिकारी, पळसदेव प्राथमिक आरोग्य केंद्र