इंदोरी परिसरात बिबट्याची दहशत; वनविभागाकडून पिंजरा लावण्यास विलंब | पुढारी

इंदोरी परिसरात बिबट्याची दहशत; वनविभागाकडून पिंजरा लावण्यास विलंब

इंदोरी : नानोलीतर्फे चाकण तसेच इंदोरी, जाधववाडी धरण परिसरात बिबट्याचे नियमित दर्शन होत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याने आतापर्यंत अनेक पाळीव प्राण्यांचा खात्मा केल्यामुळे नागरिकांनी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. वाघांच्या नैसर्गिक वसतिस्थानांवर मानवाने आक्रमण करून त्यांना नष्ट केल्यामुळे आणि त्यांच्या भक्ष्यांची संख्या कमी झाल्यामुळे बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. माणसाने वाघाच्या भक्ष्याबरोबरच जंगलेसुद्धा खाण्याचा सपाटा लावला आहे. त्यातूनच वाघांकडून मानवी वसतिमध्ये प्रवेश होत आहे.

कुत्र्यांना केले लक्ष्य
नानोलीतर्फे चाकण तसेच इंदोरी, जाधववाडी धरण परिसरात बिबट्याचे दर्शन घडणे हे काही नवीन नाही. नानोली  तर्फे चाकण परिसरातील फिरंगाईदेवी डोंगर परिसरातील घनदाट वनक्षेत्र तसेच या परिसरातील भटके कुत्रे, पोल्ट्री फार्म आदी अन्न आणि पाणी यांचा संगम या भागात आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात  ऊसक्षेत्र असल्यामुळे येथे बिबट्याचे दर्शन घडतच असते. त्यामुळे
इंदोरी परिसरातील नागरिक भयभीत  झाले आहेत.

ग्रामस्थांनी केली वनविभागाकडे तक्रार
इंदोरी-नाणोली रस्त्यावरील शेवकरमळा, ढोरेमळा तसेच जांबवडे रस्त्यावरील काशीदमळा व भंडारा डोंगर वनक्षेत्र या परिसरात अनेकांनी बिबट्या पाहिल्याचे बाळासाहेब ढोरे, संतोष मराठे, दत्तात्रय काशीद यांनी सांगितले. बिबट्याने डॉग फार्मवरील कुत्र्यांवर 3 सप्टेंबर रोजी फडशा पाडला होता. तर, तुकाराम ढोरे यांच्या पाळीव कुत्र्यावर 12 सप्टेंबर रोजी हल्ला केला होता. दरम्यान, ग्रामस्थांनी मागील आठवड्यात वडगाव मावळ वनक्षेत्र कार्यालयास माहिती दिली होती. वनविभागाकडून अद्याप परिसरात पिंजरा लावण्यात न आल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शेतीची कामे ठप्प
या परिसरातील इतिहास पहिला तर अद्याप तरी बिबट्याने मनुष्यावर हल्ला चढविला नसला तरी काही पाळीव प्राण्यांना गतप्राण केल्याचे वास्तव आहे. शिवाय वाघाच्या दहशतीमुळे या परिसरातील शेतातील विविध कामे ठप्प होत आहेत. नानोलीतर्फे चाकण येथील जगताप मळा या ठिकाणी 14 वर्षांपूर्वी वन विभागाने वयस्क बिबट्या पकडला होता. यानंतर मागील साडेचार वर्षांपासून या ठिकाणी हिवाळी हंगामात बिबट्याचे दर्शन घडले आहे.

परिसरात वन्यप्राण्यांच्या पावलांचे ठसे दिसले होते. ठशांचे नमुने परीक्षणासाठी डेहराडून येथे पाठवून त्याचा अहवाल आल्यानंतरच बिबट्याचे की तरसाचे ठसे आहेत हे सांगता येईल. तसेच, पिंजरा लावण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ठरावाचे पत्र हवे.

                                                  – बी. डी. भुजबळ, वनक्षेत्र अधिकारी

परिसरात बिबट्या फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. तसेच, त्याच्या पायाचे ठसेही मिळाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी रात्रीचा प्रवास टाळावा. पाळीव प्राण्यांना बंदिस्त जागेमध्ये बांधावे. बिबट्यांशी संबंधित काही माहिती मिळाली, तर वनअधिकार्‍यांशी संपर्क साधावा.

                                                – भारती भुजबळ, वनपाल वडगाव मावळ

इंदोरीगावाने लवकरात लवकर ग्रामपंचायत बैठकीत ठराव मंजूर करून नागपूर परिक्षेत्रकडे परिसरात पिंजरा लावण्यासाठी अर्ज केला पाहिजे. परिसरातील अनेक नागरिकांनी बिबट्या पाहिला आहे. उसामध्ये बिबट्या आणि तिचे पिल्ले असण्याची शक्यता आहे.
                                        – जयदत्त शिंदे, पोलिस पाटील, इंदोरी

या भागात ऊसक्षेत्र मोठे असल्याने यामध्ये बिबट्याचे वास्तव्य आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. परिणामी शेतीची कामे खोळंबली आहेत. तरी वनविभागाने याची दखल घ्यावी.

                                                      – जगन्नाथ शेवकर, शेतकरी

Back to top button