पुणे :चांदणी चौकातील पुलाला ड्रिल पाडण्याचे काम सुरू | पुढारी

पुणे :चांदणी चौकातील पुलाला ड्रिल पाडण्याचे काम सुरू

पुणे; पुढारी वृत्तसेवा: चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), वाहतूक पोलिस विभाग आणि इतर स्थानिक प्रशासनाने संयुक्तीन नियोजन केले आहे. त्यानुसार जुन्या पुलाच्या खांबांना ड्रील पाडून जिलेटीनच्या कांड्या लावण्यात आल्या आहेत. दरम्यान, हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

तत्पूर्वी जवळून जाणारी पाण्याची पाईपलाईन, इतर संस्थांच्या लाईनचे स्थलांतर तसेच पूल पाडण्यापूर्वी आणि पाडल्यानंतरची पर्यायी बाह्य वळण रस्ता आदींचे नियोजन महत्वाचे असून त्याबाबत अहोरात्र काम सुरु करण्यात आले आहे. या कामासाठी साधारणतः पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने आठवडाभरात किंवा पुढील आठवड्याच्या सुरुवातीलाच हा पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती एनएचएआयच्या अधिकार्‍यांनी दिली.

पुणे बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील आठवड्यात सर्व विभागाच्या अधिकार्‍यांची एकत्रित बैठक घेऊन, तत्काळ जुना पूल पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा पुल पाडण्यासाठी नोएड़ा येथील एका खासगी कंपनीला काम देण्यात आले असताना या कंपनीच्या अधिकार्‍यांनी नुकतीच स्थानिक ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली आहे. त्यानुसार कंपनीच्या अधिकार्‍यांनी पुलाच्या खांबांवरील ड्रीलचे स्थान निश्‍चित करून त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या लावण्यात आल्या आहेत.

तत्पूर्वी या रस्त्यावरून जाणारी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे, तसेच जवळून रस्त्याच्या खालून गेलेल्या पाण्याच्या पाईपलाईन आणि इतर पाईप यांचे स्थलांतर करून सुविधा सुरू ठेवणे महत्वाचे आहे, तोपर्यंत पूल पाडता येणे शक्य नसल्याचे संबंधित कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. त्यानुसार एनएचएआयने पर्यायी बाह्य वळण रस्ता, सर्व्हीस पाईल हलविण्यासाठी लोखंडी गर्डर्स आदींबाबत काम सुरू केले आहे, तर पुलाजवळील परिसरातील स्थानिकांचे स्थलांतर, पूल पाडल्यानंतर 9 ते 10 तासांचा मोठा ट्रॅफीक ब्लॉक, पूल कोसळल्यानंतर पडलेला मलबा काढण्यासाठीची व्यवस्था, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि वाहने आदींचे प्रामुख्याने नियोजन महत्वाचे आहे.

जिल्हाप्रशासन, पोलिस विभाग, महापालिका आदी विभागांना नियोजनबद्ध आराखडा देण्यात आला आहे. या आराखड्यानुसार  काम करण्यासाठी साधारणतः पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. अचानक येणार्‍या पावसामुळे कामात व्यत्यय निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अंतिम काम पूर्णत्वाकडे येताच जिल्हाधिकार्‍यांकडून पूल पाडण्याच काळ, वेळ याची मंजुरी घेतली जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनानुसार पूल पाडण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

Back to top button