पुणे शहराने गाठला 700 मिमी पावसाचा टप्पा | पुढारी

पुणे शहराने गाठला 700 मिमी पावसाचा टप्पा

पुणे : शहरातील पावसाने दोन वर्षांनंतर 700 मिमी पावसाचा टप्पा पार केला आहे. शहराची जून ते सप्टेंबरपर्यंतची सरासरी 505 मिमी इतकी आहे. मागच्या वर्षी ही सरासरी जेमतेम गाठत शहरात सप्टेंबर 2021 मध्ये 550 मिमी पाऊस झाला होता. मात्र, यंदा 12 सप्टेंबर रोजीच शहराने 712.1 मिमी इतकी सरासरी गाठली आहे. सरासरीपेक्षा 196 मिमी पाऊस जास्त झाला.

चार महिन्यांच्या सरासरीत यंदा 12 सप्टेंबरअखेर 39 टक्के पाऊस अधिक झाला आहे. शहरात यंदा जूनमध्ये अवघा 34 मिमी पाऊस झाला. दर वर्षी तो सरासरी 100 ते 150 मिमीच्या जवळपास होतो. यंदा जूनमध्ये तब्बल 130 मिमीची तूट पडली होती. मात्र, जुलैमध्ये शहरात 275 मिमी पाऊस झाला. सरासरीपेक्षा 21 टक्के जास्त पडला, तर ऑगस्टमध्ये 262 मिमी झाल्याने सरासरीपेक्षा 32 ट्क्के पाऊस अधिक झाला. सप्टेंबरमध्ये 12 दिवसांत 130 मिमी पाऊस झाल्याने यंदाच्या मोसमात 12 सप्टेंबरपर्यंत 39 टक्के अधिक पाऊस शहरात झाला आहे.

आठ दिवसांत 130 मिमी पाऊस
यंदा जून महिन्यात शहरात अवघा 34 मिमी पाऊस झाल्याने चिंता पसरली होती. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. 12 जुलैपर्यंत जूनची तूट पावसाने भरून काढली. त्यानंतर जुलैअखेर व ऑगस्टचा संपूर्ण महिना शहरात चांगला पाऊस झाल्याने पावसाने 550 मिमी पार केले. सप्टेंबरच्या आठ दिवसांत शहरात तब्बल 130 मिमी पाऊस झाल्याने शहराची यंदाची सरासरी 700 मिमी पार गेली.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चांगला पाऊस
मोसमातील एकूण पाऊस
शिवाजीनगर ः 714.1 मिमी
पाषाण ः 762.5 मिमी
लोहगाव ः 632.2 मिमी

शहरातील पाऊस
जून 2022 ः 34 मिमी
जुलै 2022 ः 275 मिमी
ऑगस्ट 2022 ः262 मिमी
सप्टेंबर 2022 ः 130 मिमी

Back to top button