आंबेठाण येथे दरोड्याच्या तयारीतील दोघे जेरबंद; तिघे फरार | पुढारी

आंबेठाण येथे दरोड्याच्या तयारीतील दोघे जेरबंद; तिघे फरार

चाकण; पुढारी वृत्तसेवा: चाकण औद्योगिक भागात आंबेठाण (ता. खेड) येथे पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या टोळीतील दोघांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली असून, त्यांचा दरोड्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 10) रात्री साडेअकराच्या सुमारास खेड तालुक्यातील आंबेठाण येथील घाटेवस्ती येथे करण्यात आली.

महाळुंगे पोलिसांनी अभिषेक ऊर्फ बबलू उत्तम भालेराव (वय 21) व सूरज संजय वाडेकर (वय 21, दोघेही रा. शिरोली, ता. खेड) यांना अटक केली असून, त्यांचे साथीदार निखिल अशोक शिंदे , मयूर कोंडिभाऊ गारगोटे आणि जावेद निजाम शेख (सर्व रा. शिरोली, ता. खेड) हे फरारी आहेत.

याबाबत पोलिसांना माहिती मिळाली, की काही लोक घाटेवस्ती येथे दरोड्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पोलिसांनी घाटेवस्ती येथील पेट्रोलपंपाजवळ दुचाकीवर उभे असलेल्या अभिषेक व सूरजला ताब्यात घेतले, याच दरम्यान बाकीचे तीन जण तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले.

ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांकडून पोलिसांनी लोखंडी रॉड, लोखंडी कटावणी, लोखंडी कोयता, दोन दुचाकी, असा एकूण 85 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी दरोडा टाकण्यासाठी आल्याचे पोलिसांना सांगितले. दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, महाळुंगे पोलिस उर्वरित फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Back to top button