प्राणिसंग्रहालयातून 2 चितळ पळाले; महापालिका कर्मचार्‍यांकडून पकडण्याचे प्रयत्न सुरू | पुढारी

प्राणिसंग्रहालयातून 2 चितळ पळाले; महापालिका कर्मचार्‍यांकडून पकडण्याचे प्रयत्न सुरू

पुणे / कात्रज; पुढारी वृत्तसेवा: कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील चितळांच्या खंदकाला रविवारी (दि.11) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे भगदाड पडले. त्यातून रात्रीत दोन चितळ बाहेर पळाले. त्यानंतर सोमवारी प्राणिसंग्रहालयातील कर्मचार्‍यांकडून या चितळांना पकडण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत हे चितळ कर्मचार्‍यांच्या हाती लागले नाहीत.

रविवारी झालेल्या पावसामुळे शहरात मोठी तारांबळ उडाली होती. याच पावसात प्राणिसंग्रहालयात रविवारी काही पर्यटकदेखील अडकून पडल्याची घटना घडली. पावसामुळे सायंकाळच्या सुमारास चितळांच्या खंदकाला पाण्यामुळे मोठे भगदाड पडले. यातून रात्री अंधारातच प्राणिसंग्रहालयाच्या या खंदकातून दोन चितळ बाहेर पळाले. दरम्यान, हे दोन चितळ प्राणिसंग्रहालयाच्या आवारातच फिरत आहेत. त्यांना पकडण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यांना पकडण्यात प्रशासनाला सोमवारी सायंकाळपर्यंत यश आलेले नाही.

सुरक्षितता आणि बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
प्राणिसंग्रहालयात यापूर्वी मोर, लांडोर, घुबड व चंदन चोरीसारख्या घटना घडलेल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार हरीण, काळवीट यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी हे दोन चितळ पळाल्यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षिततेबाबत आणि खंदक बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चितळांऐवजी चुकून जर वाघ, सिंह पळाले असते, तर काय झाले असते असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

चितळ खंदकाच्या आवारातच….
रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे प्राणिसंग्रहालयातील चितळांच्या खंदकाला भगदाड पडले. त्यातून रात्रीच्या अंधारात दोन चितळ खंदकातून बाहेर पडले. दरम्यान, हे दोन चितळ खंदकाच्या आवारातच असून, त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

कात्रज प्राणिसंग्रहालयात रविवारी झालेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली जाईल. तसेच, या घटनेची जबाबदारी निश्चित करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
                                                               – विलास कानडे,
                                                 अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

Back to top button