पुणे : ढगफुटीने जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूरला नुकसान | पुढारी

पुणे : ढगफुटीने जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूरला नुकसान

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातील तब्बल 85 गावांना या ढगफुटी पावसाचा फटका बसला असून, तब्बल 3 हजार 733 हेक्टरवरील शेतीपीक पाण्याखाली गेली आहेत.

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसांपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे, परंतु गेल्या काही दिवसांत तालुक्यांतील एक-दोन गावांमध्येच ढगफुटीसारखा पाऊस कोसळत आहे. दीड-दोन तासांच्या प्रचंड मुसळधार पावसामुळे गावातील ओढ्या-नाल्यांना अचानक पूर येऊन शेतीमध्ये पाणी शिरण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका जुन्नर व आंबेगाव तालुक्याला बसला आहे. या मुसळधार पावसामुळे हाताशी आलेली सोयाबीन व भाजीपाला भुईसपाट झाले आहे.

अनेक गावांमध्ये वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे कांद्याच्या बराख्यांमध्ये पाणी शिरले, तर अनेक भागांत कांद्याची रोपे वाया गेली आहेत. खेड उपविभागीय कृषी खात्याच्या वतीने पंचनामे करून प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. खेड तालुक्यातील 9 गावे, आंबेगाव 21, जुन्नर 54 आणि शिरूर तालुक्यातील 1 अशा 85 गावांना ढगफुटीसदृश्य पावसाचा फटका बसला असून, तब्बल 3 हजार 733 हेक्टरवरील शेत पिके पाण्याखाली गेली आहेत. यात प्रामुख्याने सोयाबीन, मका, भाजीपाला पिकांना फटका बसला आहे.

ढगफुटीसदृश पावसाचा मोठा फटका शेतपिकांना बसला आहे. कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करून नुकसानीचा प्राथमिक अंदाज तयार केला आहे. पावसाचे पाणी कमी झाल्यावर अधिक तपशीलवार पंचनामे करण्यात येतील.

                                            – मनोजकुमार ढगे, उपविभागीय कृषी अधिकारी खेड

ढगफुटी नुकसानीचा प्राथमिक अंदाज
तालुका      गावे     शेतकरी       क्षेत्र (हेक्टर)
खेड             9        1498              824
आंबेगाव      21        716                36
जुन्नर         54      6450              2869
शिरूर           01        08              1.55
एकूण           85     8672            3733

Back to top button