पुणे : प्राध्यापकांचे वेतन कमी, जागाही रिक्त! | पुढारी

पुणे : प्राध्यापकांचे वेतन कमी, जागाही रिक्त!

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. इतर वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत येथील प्राध्यापकांना 30 टक्के वेतन कमी आहे. मध्यंतरी अनुदानाअभावी वेतन रखडले होते. प्राध्यापकांच्या 30 टक्के जागाही रिक्त आहेत, त्यामुळे प्राध्यापकांमध्ये नाराजी आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांच्या सुमारे 150 जागा आहेत. त्यामध्ये सध्या 100 ते 120 प्राध्यापक कार्यरत आहेत.

इतर शासकीय महाविद्यालयांपेक्षा महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांना 30 टक्के कमी वेतन दिले जात आहे. वेतन कमी असल्यानेच प्राध्यापकांच्या जागाही रिक्त आहेत. सध्या कार्यरत असलेले प्राध्यापकही नाराज असल्याचे बोलले जात आहे. सध्याच्या प्राध्यापकांना चांगल्या संधी उपलब्ध झाल्यास ते महाविद्यालय सोडून जाण्याची शक्यता असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.

पुणे महापालिकेने वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट स्थापन करून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी केली. महापालिकेकडून ट्रस्टला मिळणार्‍या अनुदानातून महाविद्यालयाचा आर्थिक खर्च भागवला जातो. मात्र, काही तांत्रिक त्रुटींमुळे वेळेत अनुदान न मिळाल्याने गेल्या महिन्यात 125 जणांना पगार मिळाले नव्हते, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. निधी उपलब्ध झाल्यावर त्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला.

अडचणींचा सामना…
पुणे महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताना अनेक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. पुणे महानगरपालिकेने वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी स्वतंत्र वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट स्थापन केला. त्यानंतर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषाप्रमाणे यंत्रसामग्री, फर्निचर, पायाभूत सुविधा अशी तयारी करण्यात आली. मात्र, आयोगाच्या टीमने भेट दिल्यावर कामात त्रुटी असल्याने सुरुवातीला परवानगी नाकारली होती. मात्र, महापालिकेने चार – पाच महिन्यांत वर्गखोल्या, प्रयोगशाळा, त्यातील साहित्य, पुस्तके, वसतिगृह याचे काम वेगाने केल्यामुळे केंद्र शासनाने मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात महाविद्यालयाला मान्यता दिली.

महाविद्यालयातील 70 टक्के पदे भरण्यात आली आहेत. महाविद्यालयातर्फे शासनाला रिक्रुटमेंट रुल्सचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शासनाची मान्यता मिळाल्यावर लगेचच वेतनामध्येही वाढ होईल.
                                                             – डॉ. आशिष बंगिनवार,
                                     अधिष्ठाता, अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय 

Back to top button