व्याजासह मुद्दल घेवूनही जमीन घेण्याची धमकी देणाऱ्या सावकारावर गुन्हा

व्याजासह मुद्दल घेवूनही जमीन घेण्याची धमकी देणाऱ्या सावकारावर गुन्हा

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : घरगुती अडचणीसाठी १० टक्के व्याजाने घेतलेले पैसे फेडूनही डाळज नंबर २ चा सावकार अभिजित पानसरे याने "तुझी जमीन मीच घेणार" अशी भूमिका घेतली होती. मग भिगवण पोलिसांनीही या सावकारावर गुन्हा दाखल करून सावकारला चांगलाच झटका दिला. याची थोडक्यात माहिती अशी की, अभिजित सुदाम पानसरे या सावकाराने संजय भाऊसाहेब गिरमकर यांना घरगुती अडचणीसाठी एक लाख रुपये १० टक्के व्याजाने दिले होते. यावेळी सावकाराने गिरमकर यांची भादलवाडी येथील गट नंबर २२ मधील झिरो चाळीस आर जमीन क्षेत्राची विसार पावती करून घेतली होती. ही घटना जुन २०२२ ते २७ ऑगस्ट दरम्यान घडली आहे.

दरम्यान गिरमकर यांनी पानसरे यांचे मुद्दल व व्याजासह १ लाख १० हजार परत केले व नोटरी केलेल्या जमिनीचा दस्त परत मागितला असता सावकार पानसरे याने गिरमकर यांना मी तुझी जमीन घेणार आहे असे म्हणत त्यांना व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे गिरमकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून भिगवण पोलिसांनी सावकार अभिजित पानसरे यांच्या विरुद्ध 'महाराष्ट्र सावकरकी अधिनियमांतर्गत' गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत.

परिसरात सावकारकी बोकाळली
इंदापुर व बारामतीनंतर सावकारीचे सर्वात जास्त पेव भिगवण व भागात आहे. मस्तवाल सावकारांचा व्याजाच्या पैशावर अक्षरशः हैदोस व नंगानाच सुरू असुन तो ठेचून काढण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी पीडितांनी पुढे येणे आवश्यक आहे; अन्यथा हे सावकार पीडित गरिबांच्या झोपडीला कधी आग लावतील हे कळणारदेखील नाही. एवढेच नव्हे तर अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत व अनेकांचे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत; मात्र सावकारांच्या दहशतीखाली अनेजण दबलेले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news