नायगाव : लॉजिस्टिक पार्क प्रकल्पग्रस्तांना खा. सुळे यांच्याकडून अपेक्षा | पुढारी

नायगाव : लॉजिस्टिक पार्क प्रकल्पग्रस्तांना खा. सुळे यांच्याकडून अपेक्षा

नायगाव; पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीने शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे सोमवारी (दि. 12) पुरंदरच्या दौर्‍यावर येत आहेत. नायगाव (ता. पुरंदर) येथेदेखील दुपारी दोन वाजता त्या येणार आहेत. याच नायगाव परिसरात लॉजिस्टिक पार्कची घोषणा नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याबाबत खासदार सुळे काय भाष्य करतात, याकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे.

प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा पुरंदरला झाल्यानंतर प्रस्तावित लॉजिस्टिक पार्कदेखील पुरंदरला नायगाव परिसरात पुरंदर-बारामती-दौंड या तीन तालुक्याच्या सीमेवर होणार आहे. राज्य सरकारकडून लॉजिस्टिक पार्कला हिरवा कंदिल मिळाला आहे.
प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरुवातीला पारगाव मेमाणे परिसरातील जागा सुचविण्यात आली होती. तदनंतर शेतकर्‍यांचा विरोध पाहता जागेत बदल करून नायगाव परिसरातील जागा सुचविली.

येथील जागा मात्र विमानतळासाठी अनुकूल नसल्याने रद्द करण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आता पुन्हा लॉजिस्टिक पार्कसाठी नायगाव परिसरातील जागा सुचविली आहे. या जागेला राज्य सरकारने हिरवा कंदिल दिला आहे. यामुळे येथील ग्रामस्थ पुन्हा कोड्यात पडले आहेत.

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे सोमवारी पुरंदर तालुक्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे या भागात प्रस्तावित लॉजिस्टिक पार्क प्रकल्प होऊ देणार नाहीत, अशा अपेक्षा आहेत. शेती, पिकांची झालेली नुकसान पाहणीसाठी आल्यानंतर खासदार सुळे शेतकर्‍यांना काय शब्द देणार, याकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे.

Back to top button