पावसामुळे पर्यटकांची तारांबळ; सिंहगड परिसरातील चित्र | पुढारी

पावसामुळे पर्यटकांची तारांबळ; सिंहगड परिसरातील चित्र

खडकवासला : गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटकांनी सिंहगडावर धाव घेतली. त्यामुळे सिंहगडावर सकाळी दहा पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली.

जोरदार पावसामुळे खडकवासला धरण माथ्यावरील पुणे-पानशेत रस्त्यावर पाणी साठल्याने वाहतूक कोंडी झाली. यामुळे पर्यटकांचे हाल झाले. खडकवासला, सिंहगड भागासह पानशेत, राजगड भागात रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. खडकवासला धरण चौपाटी, पानशेत, राजगड भागातही पर्यटकांनी सुटीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.

दिवसभरात गडावर वाहनांने जाणार्‍या पर्यटकांकडून सव्वा लाख रुपयांचा टोल वन खात्याने वसूल केला. गडावरील वाहनतळ फुल्ल झाल्याने सकाळी साडेदहा वाजता डोणजे, गोळेवाडी व अवसरवाडी हे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले. गडावरून खाली पर्यटक येऊ लागले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने घाट रस्त्यावरील वाहतूक सुरू करण्यात आली. दिवसभरात आठ ते दहा वेळा घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली.

Back to top button