बाणेरमधील रस्त्यांना आले नद्यांचे स्वरूप! | पुढारी

बाणेरमधील रस्त्यांना आले नद्यांचे स्वरूप!

बाणेर : औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरात जोरदार पावसामुळे पाणी साचल्याने रस्त्यांना नदी, नाल्यांचे स्वरूप आले होते. पाषाण परिसरात काही ठिकाणी घरांत पाणी शिरले. पाषाण-सूस रस्ता, चिदानंद सोसायटीसमोर, सुतारवाडी स्मशानभूमीजवळ, शनी मंदिर एनडीए रोड पाषाण, विठ्ठलनगर व लोंढे वस्ती परिसरात घरात पाणी शिरले. सूस रोड येथे चालू असलेल्या फुटपाथच्या कामामुळे व छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडली.

राम नदीला पूर आल्यामुळे परिसरातील सोमेश्वर वाडी येथील सोमेश्वर मंदिरातील पिंड पाण्याखाली गेली. रामनदीकडेला असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. बाणेरमधील प्रमुख रस्त्यासह अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. बाटा शोरूम, भैरवी हॉटेल आणि सोमेश्वरवाडी चौकात पाणी साठल्याचे दिसून आले. सूसगाव महादेवनगर येथे रस्त्याला नदीचे रूप आले होते. यामुळे या परिसरातील रहिवाशी नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला होता.

Back to top button