पुणे : दुचाकी चोरणारे त्रिकुट जाळ्यात, 5 गाड्या जप्त | पुढारी

पुणे : दुचाकी चोरणारे त्रिकुट जाळ्यात, 5 गाड्या जप्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कर्वेनगर येथील डी-मार्टच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी करणार्‍या तिघांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली. 18 गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून पाच दुचाकी जप्त केल्या.  सागर अशोक चव्हाण (वय 27, रा. जांभूळवाडी रोड, दत्तनगर), संदीप संपत आंधळे (वय 21, रा. गुजरवाडी फाटा, कात्रज), आकाश वसंत लोखंडे (वय 22, रा. रामनगर, वारजे माळवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सागर चव्हाण हा जांभूळवाडी परिसरात विघ्नहर्ता नावाचे गॅरेज चालवतो. चोरी केलेल्या दुचाकीचे स्पेअरपार्ट त्याने काढून इतर दुचाकीला बसवले असून, काही दुचाकी भंगारवाल्याला देखील विकल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.  दुचाकी चोरीच्या अनुषंगाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे हद्दीत गस्तीवर होते. त्या वेळी पोलिस कर्मचारी प्रदीप शेलार व नंदकिशोर चव्हाण यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती, की दुचाकी चोरी करणारा एक तरुण जांभूळवाडी परिसरात गॅरेज चालवतो आहे. त्यानुसार वारजे पोलिसांनी वेषांतर करून चव्हाण चालवत असलेल्या गॅरेज परिसरात सापळा लावला.

दुकानाचे शटर उघडत असताना चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. संदीप आणि सागर या दोघांनी दुचाकी चोरी केल्याचे समोर आले. त्या वेळी आकाश याचेदेखील नाव समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके, दत्तराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, रामेश्वर पार्वे, कर्मचारी प्रदीप शेलार, हनुमंत मासाळ, अमोर राऊत, श्रीकांत भांगरे, हेमंत रोकडे यांच्या पथकाने केली.

तडीपार जेरबंद
विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या तडीपार गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. राज रवींद्र पवार (वय 24, रा. कदमवाक वस्ती) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज याला परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम—ता पाटील यांनी डिसेंबर 2021 मध्ये दोन वर्षांसाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्याची तडीपारी संपलेली नसताना देखील तो गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास आला होता. त्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पथकाने त्याला सहभागी होण्यापूर्वीच जेरबंद केले.

मुलगा बेपत्ता
घरच्यांबरोबर गणपती विसर्जनासाठी गेलेला मुलगा बेपत्ता झाल्याचा प्रकार सोमवार पेठेतील केईएम हॉस्पिटल परिसरात 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडला. पियूष थोरात (17) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत मनीषा चंद्रकांत थोरात (45, रा. रास्ता पेठ, मंगलमूर्ती रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. मुलगा घरच्यांबरोबर गणपती पाहण्यासाठी गेल्यानंतर अचानक गायब झाला होता. परंतु, त्याची तब्बेत ठिक नसल्याने घरी गेला असावा, असा त्यांच्या घरच्यांचा समज झाला होता. परंतु, घरी जाऊन पाहिल्यानंतरही तो न सापडल्याने त्यांनी फिर्याद दिली.

तरुणीचा विनयभंग
पाणी भरत असलेल्या तरुणीचा पाठलाग करून विनयभंग करणार्‍या एका 40 वर्षीय व्यक्तीला हडपसर पोलिसांनी अटक केली. नितीन सतीश भोसले (40, रा. ओम गणेश पार्क, मांजरी बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. याबाबत एका 26 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button