शिरुर लोकसभा मतदारसंघ बांधणीवर भाजपचे लक्ष | पुढारी

शिरुर लोकसभा मतदारसंघ बांधणीवर भाजपचे लक्ष

पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी भाजपकडून राबविण्यात येणार्‍या ‘लोकसभा प्रवास’ योजनेतंर्गत केंद्रीय अदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंग या शिरुर लोकसभा मतदारसंघात 14 ते 16 तारखेदरम्यान तीन दिवसांचा दौरा करणार आहेत, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला संयोजक अ‍ॅड. धमेंद्र खांडरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बुचके, माजी सदस्य शरद बुट्टे-पाटील आदी उपस्थित होते. देशभरातील 144 लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष केद्रित केले आहे. त्यामध्ये राज्यातील 16 मतदारसंघाचा समावेश आहे. त्या अंतर्गत शिरुर मतदारसंघाचा
समावेश आहे.

दौरा कालावधीत 14 तारखेला पहिल्या दिवशी भोसरी, आळंदी आणि मंचर येथे रेणुका सिंग येणार आहेत. त्यानंतर दौर्‍यात दुसर्‍या दिवशी भीमाशंकर, ओझर, नारायणगाव, शिक्रापूर येथे तर, तिसर्‍या दिवशी उरळीकांचन, हडपसर आणि पुणे येथे त्या असणार आहेत.

शिरुर मतदारसंघात बैठका
राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघांवर दफोकस’ केले आहे. हे मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचे दौरे केले आहे. बुथनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या आहेत, अशी माहिती मिसाळ यांनी दिली.

प्रलंबित प्रश्नांसाठी केंद्राकडे पाठपुरावा
आगामी दीड वर्षात शिरुर लोकसभा मतदार संघातील प्रलंबित प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवून मार्गी लावण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. नदी सुधार प्रकल्प, पुणे-नाशिक महामार्ग, रेडझोन, तीर्थक्षेत्र विकास, ग्रामीण भागातील राष्ट्रीय महामार्ग आदी विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार मिसाळ यांनी नमूद केले.

Back to top button