पिंपरी : दोषी अधिकार्‍यांवर कारवाईस टाळाटाळ? | पुढारी

पिंपरी : दोषी अधिकार्‍यांवर कारवाईस टाळाटाळ?

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : नोटराईज्ड कागदपत्रांच्या आधारे एकाच कुटुंबांतील अनेक सदस्यांच्या नावे मिळकतीची विभागणी करून हस्तांतरण करण्यात आले. नियमबाह्यपणे नोंद करण्यात आली. या प्रकाराबद्दल संबंधित दोषी अधिकार्‍यास नोटीस देऊन साडेतीन महिने झाले तरी, अद्याप कारवाई झालेली नाही. कारवाई टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे. ‘नोटरी प्रतिज्ञापत्राद्वारे शेकडो मिळकतींच्या नोंदी’ या शीर्षकाखाली ‘पुढारी’ने सोमवारी (दि.5) ठळक वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये चिखली, तळवडे कर संकलन विभागीय कार्यालयात प्रकार समोर आला आहे. दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

चिखली कर संकलन विभागीय कार्यालयाचे सहायक मंडलाधिकारी संजय लांडगे यांनी 150 ते 200 मिळकतींचे नोटराईज्ड कागदपत्रांच्या आधारे विभाजन करून नोंद केली आहे. त्यातील बहुतांश प्रकरणे एकाच कुटुंबांतील सदस्यांचे आहेत. त्यामुळे शासनासह महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकारे जाणीवपूर्वक नियमबाह्यपणे नोंदणी करून शिस्तभंग केल्याचा ठपका ठेऊन ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांनी सहायक मंडलाधिकारी लांडगे यांना 4 जून 2022 ला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सोबत नियमबाह्यपणे नोंद केलेल्या मिळकतींची यादी जोडण्यात आली आहे.

नोटीस देऊन साडेतीन महिने लोटले तरी, अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे चिखली, तळवडे कर संकलन कार्यालयात उलटसुलट चर्चा रंगली आहे. पालिकेचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान करणार्‍या दोषी अधिकार्‍यांवर आयुक्त शेखर सिंह यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Back to top button